पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या कादंबरीचे अनेक भाषांत अनुवाद झाले. त्या भाषिकांत ही कादंबरी त्यांची भाषिक कादंबरी मानली गेली, इतके तिचे अनुवाद प्रभावी ठरले.
 व्यवहार आणि ध्येयवाद, तरल प्रीती आणि उत्कट भक्ती, आत्मप्रेम व मानवधर्म, इत्यादी धाग्यांनी हिरवा चाफा'चा जीवनपट विणलेला आहे. तात्यासाहेब कालेलकरांची कन्या सुलभा, ती डॉक्टर होते. तिचा प्रियकर विजय बॅरिस्टर असतो; पण ती विवाह मात्र करते घरातील मोलकरणीच्या मुलाशी. तोही तुरुंगात. सुलभाचा भाऊ मनोहर वाममार्गी होऊन नायकिणीच्या नादाला लागतो. नायकिणीचा खून होतो. पापभिरू मनोहर तेथून पळ काढतो; पण ‘नायकिणीचा' अशीच त्याची समाजलेखी ओळख राहते. तो आपल्या वडिलांच्या रखेलीच्या मुलीशी संधान बांधतो. त्यामुळे अधिक दुःखाच्या गर्तेत अडकतो. प्रेमभाव हा हिरवा चाफा असतो. त्याच्या अभावी माणसाचं जीवन शोकात्म कसे बनते, हे खांडेकरांनी सन १९३९ साली लिहिलेल्या या कादंबरीतून दाखवून दिले आहे.
 वि. स. खांडेकर शिरोडा सोडून कोल्हापुरी आले, ते ‘हंस पिक्चर्स'च्या पटकथा लिहिण्यासाठी म्हणून. त्या काळात त्यांनी अशा अनेक पटकथा लिहिल्या की, ज्यांच्या नंतर कादंब-याही झाल्या. या पठडीत ‘रिकामा देव्हारा',‘सुखाचा शोध', 'अश्रू'सारख्या कादंब-या येतात. 'देवता' चित्रपटाच्या निर्मितीआधी तिचे झालेले कादंबरी रूप म्हणजे ‘रिकामा देव्हारा'. आधी कादंबरी प्रकाशित झाली. (१९३४). ती गाजली. मग तिचा मराठी चित्रपट झाला (१९३९). तोही यशस्वी झाला, म्हणून मग 'देवता','मंदिर' नावाने १९४८ मध्ये हिंदीत प्रकाशित झाला. कादंबरी व चित्रपट क्रम उलटेसुलटे होत राहिले.

 अशोकचे वडील मुलगी शोभेल अशा सुशीलेशी विवाह करतात. मुलगा त्याला विरोध करतो. वडिलांना समजावतो की, स्त्री भोग्या नसून देवता आहे. स्त्रीस प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या इराद्याने लिहिलेली ही कादंबरी. स्त्रीचं घरात तेच स्थान हवे, जे मंदिरात देवतेच्या मूर्तीचं. ते नसेल, तर घर हा रिकामा देव्हारा ठरतो. "आर्थिक उलथापालथीमुळे मध्यमवर्गातील स्त्री घराबाहेर पडली, नोकरी करू लागली, सर्रास पुरुषांत मिसळू लागली. यात वावगे असे काहीच झाले नाही; पण ही स्त्री तिच्या शीलाच्या दृष्टीने धड ना पौर्वात्य, ना पाश्चात्त्य अशा आजच्या समाजात सुरक्षित आहे का? असा प्रश्न खांडेकर या कादंबरीतून विचारतात तेव्हा मात्र वाचक अंतर्मुख होतो. मला वाटतं, हेच या कादंबरीचं यश आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/३७