पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘सुखाचा शोध' ही खांडेकरांची आठवी कादंबरी. ती प्रथमतः सन १९३४ मध्ये प्रकाशित झाली. पुढे या कादंबरीवर ‘हंस पिक्चर्स'ने सन १९३९ ला याच नावाने चित्रपट काढला तेव्हा या कादंबरीची सचित्र आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. छायाचित्रे अर्थातच चित्रपटातील होती. ही चित्र आवृत्ती त्या वेळी चित्रपटगृहांत विक्रीस उपलब्ध होती. प्रेक्षक चित्रपटाच्या तिकिटाबरोबर कादंबरीही खरेदी करीत. या कादंबरीचे कथानक खांडेकरीय होते. मानवी जीवन सुख आणि दुःखांनी भरलेले आहे. माणूस सतत सुखाच्या शोधात असतो. सर्व प्रकारची सुखं मिळाली की माणूस अतृप्त का राहतो, याचा शोध घेत खांडेकर सांगतात की, 'सुख निरपेक्ष सेवेत आहे, सुख जिवाला जीव देणाच्या माणसावर प्रेम करण्यात आहे.' कादंबरीची नायिका माणिक समाजसेविका असते. सुयोग्य मार्गदर्शकाअभावी ती निराश होऊन आपल्या भावनांना तिलांजली देते. याविरुद्ध आनंद आणि उषा एकमेकांवर प्रेम करीत असल्याने त्या जोरावर उषा आनंदाला माणसात आणते, सुधारते. कष्टाने माणसाचे जीवन सुसह्य होते, हे सांगणारी सदर कादंबरीही अनेक भाषांत अनुवादित झाली आहे.
 ‘पांढरे ढग' ही खांडेकरांच्या आजवरच्या कादंबरींपेक्षा वेगळी असल्याने तिचे खांडेकरांच्या कादंबरी लेखनविकासात महत्त्वाचे स्थान आहे. एक तर या कादंबरीने भाषिक वळण घेऊन ती अलंकारमुक्त अशी सहज आणि म्हणूनच प्रभावी ठरली. दुसरे असे की, आजवरच्या कादंब-यांत खांडेकर शोषितांची बाजू घेत. निम्नवर्गीय चित्रण करीत. यात मध्यमवर्ग चित्रणाचा केंद्र आहे. त्या वर्गातील दलितांचे चित्रण करताना अभयसारखा बुद्धिमान; परंतु भावनाशील तरुण चित्रित करून नायकाची पठडी पण खांडेकरांनी बदलून टाकली. सत्त्वशून्य आणि ध्येयशून्य होत चाललेल्या मध्यमवर्गाला दिशादिग्दर्शन करण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या या कादंबरीत अभयची धडपड हा खांडेकरांच्या स्वप्नातील देशघडणीचा प्रयत्न होय. सन १९३९ साली प्रकाशित ही कादंबरी ‘समाज सुखी करायला आधी सामाजिक मन निर्माण केले पाहिजे. मानवी हक्कांकरिता झगडायला, लढायला, प्रसंगी मरायलाही ज्या वेळी तयार होईल त्याच वेळी आजचे बिकट प्रश्न सुटतील." असे ठामपणे सांगते.

 सामाजिक विचारांच्या कादंबऱ्यांत आलेला विषयांचा तोचतोचपणा दूर करण्यासाठी रुचिपालट म्हणून लिहिलेली कादंबरी ‘पहिले प्रेम’ विषय म्हणून वाचकांच्या पसंतीस न उतरती तर आश्चर्य! प्रत्येक व्यक्ती पहिल्या प्रेमाच्या अनुभवातून जात असल्याने या विषयास त्रिकालाबाधित व विश्वव्यापी अनुभवाचे रूप आले आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/३८