पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जीवनात आलेल्या सुरंगा, सुलोचना, विद्याधर, कृष्णा, दादासाहेब, आदींमुळे जीवनातील दरी, अंतर त्याला उमगतं. समाजातील विषमता केवळ सर्वस्पर्शी समतेनेच येऊ शकेल, असा आशावाद जागवणारी ही कादंबरी खांडेकर पठडीतील आदर्शोन्मुख वास्तववादी साहित्यकृती होय. या कादंबरीत खांडेकरांनी जीवनातील विविध क्षेत्रांतील ‘दोन ध्रुव' चित्रित केले आहेत.
 वि. स. खांडेकरांची सर्वाधिक आवडती कादंबरी म्हणजे सन १९२४ साली प्रकाशित ‘उल्का' होय. ती त्यांनी ऑक्टोबर, १९३३ मध्ये लिहिली. चप्पल आहे, पण छत्री नाही अशी कुरकुर करणारा मध्यमवर्ग एकीकडे व दुसरीकडे दोन वेळची भाकरी न मिळणारा समाज. ‘दोन ध्रुवां'मधील तळमळ, तगमग या कादंबरीतही आढळते. जगातील दुःखे नुसत्या पवित्र इच्छेने नाहीशी होत नाहीत; ती त्यागाने, सेवेने, संघटनेने आणि कर्तृत्वानेच दूर करावी लागतात. हे सांगण्यासाठी त्यांनी या कादंबरीत अन्यायाशी प्राणपणाने लढणाच्या चंद्रकांत या तरुणाची निर्मिती केली. ही निर्मिती म्हणजे खांडेकरांचे Catharsisच होय. लोक या रचनेस राजकीय कादंबरी मानत असले तरी खांडेकर मात्र ते साफ नाकारतात. प्रा. ग. प्र. प्रधानांनी मात्र आपण ही कादंबरी तरुणपणी वाचली व आपण राजकीय, सामाजिक चळवळीत आले पाहिजे, असे वाटून उडी घेतल्याचे कबूल केले आहे. उल्का ही नायिका. खेड्यात वाढलेली. वडिलांच्या संस्काराने समाजसेवेत येते. वसंतशी होणारा विवाह टळतो. ती माणिकरावांच्या प्रेमात पडते. शेवटी बाबूराव पंडित या जमीनदाराशी तिचा विवाह होतो. चंद्रकांतसोबत ती कामगारांचा लढा लढते. भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर ट्रस्ट करून समाजसेवा चालू ठेवते. या सर्वांमागे गांधीजींची विश्वस्त संकल्पना असल्याचे दिसते. महात्मा गांधींच्या विचार व कार्याच्या खांडेकरांवरील प्रभावाचा परिणाम म्हणूनही या कादंबरीकडे पाहिलं पाहिजे.

 वैचारिक द्वंद्व हे वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य. ते रचनांच्या शीर्षकातही बऱ्याचदा प्रतिबिंबित होत राहते. दोन मने' अशा शृंखलेतीलच एक कडी होय. ‘समतेची प्रामाणिकपणे पूजा करणाच्या नव्या समाजावर दृष्टी ठेवून साहित्यिकारांनी स्वतंत्र देशाची स्वप्ने पाहायला हवीत. असं आवाहन करणारी ही कादंबरी. बॅ. बाळासाहेब देशमुख निर्मलाशी विवाहबद्ध होतात. ती सोज्ज्वळ स्त्री असते. तिच्याशी संसार करीत असताना चपला नावाच्या सिनेनटीच्या प्रेमजाळात अडकतात. निर्मलेचा त्याग व चपलेचा उपभोग यांत शेवटी त्यागाचा विजय होतो. श्री व चपला या दोन मनांची ही कथा होय. सुबोध, ललिता,प्रो. आगटे, इत्यादी पात्रे कथेचा पट खुलवीत उद्देशाप्रत या कथेस नेतात.

वि. स. खांडेकर चरित्र/३६