पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वि. स. खांडेकर उपजत शिक्षक होते. शिरोड्याच्या शाळेत संस्कृत, इंग्रजी, बीजगणित, भूमिती पडेल ते विषय त्यांनी शिकविले होतेच. मुली शिकत असताना मॅट्रिकपर्यंत ते घरी त्यांना संस्कृत, इंग्रजी, बीजगणित शिकण्यास मदत करीत. तीच गोष्ट मुली एम. ए. करतानाही. खाडिलकरांची नाटके खांडेकर त्यांना शिकवीत. मुलींच्या अगोदर बायकोने शिकावे, वाचावे, असा त्यांचा प्रयत्न होता. ते पत्नी उषाताईंना सुरुवातीच्या काळात वाचूनही दाखवीत; पण उषाताईंचा ओढा शिक्षणापेक्षा संसाराकडे अधिक होता. त्या स्वयंपाकात सुगरण, राहण्यात टापटीप होत्या. घर नीटनेटकं ठेवण्यात त्या दक्ष होत्या. पत्नीच्या निधनानंतर (२६ ऑक्टोबर, १९५८) खांडेकरांनीच मुला-मुलींचा सांभाळ केला. पत्नीबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना सदैव भरलेली असायची.
 त्यांच्या वृद्धापकाळात मोठी मुलगी मंदाकिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्या नोकरी सांभाळून वि. स. खांडेकरांचे सारे करीत. लेखनिक, लोकांचे येणे-जाणे, पुढे वि. स. खांडेकरांचे वृद्धत्व, अंधत्व साऱ्या समरप्रसंगी त्या खांडेकरांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या. पत्नी निवर्तल्यानंतरही त्यांना जे १८, १९ वर्षांचं आयुष्य लाभले, त्या काळात मंदाताईच त्यांच्या पालक होत्या.
 वि. स. खांडेकर आचार, विचारांनी खरे पुरोगामी होते अन् खरे तर ‘नास्तिक होते. देवावर त्यांचा विश्वास नव्हता... घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे कधीही झाली नाही. धार्मिक विधीही होत नसत. सकाळ, संध्याकाळी फिरण्याचा खांडेकरांना छंद होता. फिरायला जाताना कोणीतरी नेहमी त्यांच्याबरोबर असायचे. दत्ताराम घाटे, कवी यशवंत, बा. भ. बोरकर, कवी गिरीश, नाटककार वसंत कानेटकर, प्रभृती मित्र, साहित्यिकांचे घरी येणे-जाणे, राहणे असायचे.
 टपाल वाचणे, उत्तरे लिहिण्याचा खांडेकरांना छंद होता. येणाऱ्या टपालाला उत्तर देण्याचा त्यांचा प्रघात व कटाक्ष होता. सामाजिक भावनेने विद्यार्थी, संस्था, उपक्रमांना ते मदत करीत. त्यांच्याकडे वाचक, स्नेही,आप्त, मार्गदर्शनासाठी येत. वेळ, प्रकृतीची तमा न बाळगता खांडेकर सर्वांशी हितगुज करीत. लहान-मोठा, आपपर असा भेद ते बाळगत नसत. माणूसप्रेमी, समाजशील गृहस्थ खांडेकर सर्वांचे सुहृद होते.
साहित्य-समाजाचे नेतृत्व

 बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषा व साहित्याचे केंद्र म्हणून बडोद्याचे महत्त्व प्रारंभापासूनच राहिले आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजाश्रयाचे ते फळ होय.

वि. स. खांडेकर चरित्र/२८