पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सन १९३४ च्या २५ डिसेंबरला म्हणजे नाताळात तेथील मराठी साहित्य संमेलनाचे १९ वे अधिवेशन योजले होते. त्या वेळी वेगवेगळ्या साहित्यप्रकारांना वाहिलेली शाखासंमेलने घेण्याचा प्रघात होता. या संमेलनात पां. वा. काणे (भाषा), महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (इतिहास), माधव ज्यूलियन (काव्य), इत्यादींबरोबर वि. स. खांडेकरांची कथासंमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्या वेळी वि. स. खांडेकर होते अवघे ३६ वर्षांचे. कथासाहित्यातील त्यांची उमेदवारी होती अवघ्या १५ वर्षांची; पण या काळात त्यांच्या अनेक कथा नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. शिवाय नवमल्लिका', 'दत्तक'आणि इतर कथा', 'जीवनकला’, ‘ऊनपाऊस' यांसारखे कथासंग्रह प्रकाशित झाले होते. वाचकांची त्या कथांना, भाषा व शैलीच्या नवेपणामुळे मोठी पसंती लाभली होती. ही निवड त्याचीच पोचपावती होती. या निवडीने वि. स. खांडेकरांना साहित्यवर्तुळात मान्यताप्राप्त साहित्यिक म्हणून सन्मान लाभला. तेथून सन्मानाची शृंखला आजीवन सुरूच राहिली. त्यानंतर त्यांना गोमंतक साहित्य संमेलन, मडगाव (१९३५), शारदोपासक साहित्य संमेलन, पुणे (१९३५), मुंबई व उपनगर साहित्य संमेलन, दादर (१९३५), सोलापूर प्रांतिक साहित्य संमेलन (१९३६), दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, जमखंडी (१९४0), अशी एकापाठोपाठ एक अध्यक्षपदे मिळत राहिली. सन १९४१ला तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचा (आजचे अखिल भारतीय साहित्य संमेलन) रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळून चाळिशीचत ते मराठी साहित्य, संस्कृती, भाषेचे अग्रणी नेते बनले.
 त्यानंतरच्या १९७५ पर्यंतच्या पस्तीस वर्षांत कोणत्याही मोठ्या साहित्यिक उपक्रमाचे अध्यक्षपद वि. स. खांडेकरांकडे असणार हे ठरूनच गेलेलं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, भा. रा. तांबे, केशवसुत यांची जन्मशताब्दी, नटवर्य केशवराव दाते सन्मान असे कितीतरी उपक्रम वि. स. खांडेकरांच्या नेतृत्वाने व सक्रिय सहभागाने पार पडले. निधी संकलन, स्मारक ग्रंथ संपादन, अध्यक्षीय भाषण, इत्यादींतून वि. स. खांडेकरांचे साहित्यिक समाजाचं अनभिषिक्त सम्राटपण सिद्ध होत गेले व मान्यता पावलं.
पुरस्कार व सन्मान


भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर सन १९२० च्या दरम्यान महात्मा गांधीजींकडे आले. याच वेळी वि. स. खांडेकर यांनी लेखक म्हणून प्रवेश केला.

वि. स. खांडेकर चरित्र/२९