पण सरकारी मदत घेणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांच्यावर बंधन होते; परंतु स्वयंसेवक, व्यवस्थापन, इत्यादींमध्ये ते सक्रिय होते. अप्पा नाबरांच्या घरावर अटकेनंतर जप्ती आली होती. हृदयाची हाक' कादंबरीच्या मानधनाची रक्कम देऊन खांडेकरांनी अप्पा नाबरांचे घर वाचविले. खांडेकरांनी ‘वैनतेय'मध्ये सत्याग्रहाची बातमीपत्रे लिहिली. सभांत भाषणे केली. सत्याग्रहात भाग घेऊ न शकल्याचे शल्य त्यांनी जीवनभर गांधीवादी विचार-आचाराचा वसा जपून भरून काढले. गांधी जन्मशताब्दीस विपुल लेखन केले. त्याचे संकलन, संपादन ‘दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी नावाने मी केले असून ते प्रकाशित झाले आहे.
विविधांगी लेखन
वि. स. खांडेकरांनी सन १९३० ते १९३५ या कालखंडात केवळ विपुल लेखन केले असे नाही, तर जे लेखन केले ते विविधांगीही होते. 'संगीत रंकाचे राज्य' सन १९२८ ला प्रकाशित झाल्यावर लगेच १९२९ मध्ये ‘नवमल्लिका' हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. दरम्यान, खांडेकरांना वक्ते म्हणूनही आमंत्रित केले जाऊ लागले होते. त्या काळी ‘भारत गौरवमाला' वाचकांच्या पसंतीस उतरली होती. मंगेशराव कुलकर्णी त्यासाठी खूप मेहनत घेत. खांडेकरांचे स्नेही गं. दे. खानोलकर त्या वेळी भारत गौरवमालेत काम करीत. त्यांच्या सांगण्यावरून खांडेकरांनी आपली पहिली कादंबरी ‘हृदयाची हाक' लिहिली व एप्रिल, १९३० मध्ये लगेच ती प्रकाशितही झाली. एव्हाना वि. स. खांडेकर बहुप्रसव साहित्यिक म्हणून वाङ्मय वर्तुळात सर्वपरिचित झाले होते. तत्कालीन नियतकालिकांत ते नियमित लिहीत. या काळात त्यांनी ३ लेख, ५ कविता, ११ परीक्षणे, १९ कथा, ३ लघुनिबंध लिहिले. शिरोड्यातील निसर्ग व खेड्यातील निवांत जीवन हे त्याचं कारण होतं. सन १९३१ मध्ये 'कांचनमृग' कादंबरीनंतर लगेचच त्यांचे ‘गडकरी : व्यक्ती व वाङ्मय' प्रकाशित झाले. सन १९३२ मध्ये त्यांचे ‘आगरकर चरित्र' वाचकांच्या हाती आले. नंतर ‘उल्का (१९३४), ‘दोन ध्रुव' (१९२४) या कादंबऱ्या व ‘दत्तक व इतर गोष्टी (१९३४) चे प्रकाशन झाले.
यामुळे वि. स. खांडेकर मान्यताप्राप्त साहित्यिक बनले. बडोद्याच्या साहित्य संमेलनात कथा विभागाचे अध्यक्षपद त्यांना लाभले. पुढे सन १९३५ ला तर ते पहिल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. पाठोपाठ त्यांना पुण्याच्या शारदोपासक संमेलनाच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद मिळाले.