पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नंतर ते मुंबई मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष झाले. त्यांचे विचार व मते यांना एक प्रकारची मान्यता लाभून ते मराठी साहित्यरसिकांचे प्रिय लेखक, वक्ते, विचारक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार म्हणून सन्मानित झाले. त्यांच्या साहित्य विचारांतील गांभीर्य, नवता व भाषेतील सौंदर्य यांची विलक्षण मोहिनी मराठी भाषा व साहित्यात निर्माण झाली होती. मराठी वाचक ‘वि. स. खांडेकर' शीर्षक दिसताच प्रथम पसंतीने त्यांना वाचू लागला.
चंदेरी दुनियेत पदार्पण
 वि. स. खांडेकरांच्या घरी २० जानेवारी, १९३६ रोजी पुत्ररत्न झाले. सर्वत्र आनंदीआनंद होता. वि. स. खांडेकर यांनी मुलाचे नाव अविनाश ठेवून जीवनावरची दुर्दम्य आस्थाच व्यक्त केली होती. तशातच मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांनी खांडेकरांना चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचे आमंत्रण दिल्याने अनपेक्षितपणे त्यांच्यापुढे साहित्याचे नवे दालन व माध्यम खुले झाले. प्रथम त्यांनी या निमंत्रणाकडे दुर्लक्ष केले होते ते या साशंकतेने की, हे काम त्यांना आपल्या आवाक्याबाहेरचे वाटायचे; पण मग आग्रहामुळे त्यांनी प्रयत्न करायचे ठरवून ‘छाया' ही पहिली पटकथा 'हंस'ला दिली व ती निर्माता व दिग्दर्शकांच्या पसंतीला उतरल्याने लगेचच मुहूर्त करून तिचे छायाचित्रण सुरू झाले. सहा महिन्यांत चित्रपट तयार होऊन तो २० जून, १९३६ रोजी मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर, लीला चिटणीस, इंदिरा वाडकर, अनंत मराठे यांच्या या बोलपटात भूमिका होत्या. पांडुरंग नाईक यांचे चित्रीकरण होते. अण्णासाहेब माईणकरांचे यास संगीत लाभले होते. हिंदीत डब करून तो प्रकाशित करण्यात आला होता.

 वि. स. खांडेकर १९३६ ते १९६२ पर्यंत चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत होते. खांडेकरांनी मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू अशा भाषांत सुमारे २८ चित्रपटांच्या पटकथा, संवाद आणि गाणी लिहिली. त्यांच्या पहिल्या चित्रपटास गोहर सुवर्णपदक, तर अंतिम ‘माणसाला पंख असतात'ला भारत व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला होता. साहित्याप्रमाणेच खांडेकर चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. त्यांना भारतीय साहित्यिक बनविण्यात चित्रपटांचाही मोठा वाटा आहे. आपल्या चित्रपटांतून खांडेकरांनी अनेक सामाजिक समस्यांचे चित्रण केले, तसेच विनोदी कथा लिहून मनोरंजनही. त्यांच्या अनेक चित्रपटांच्या गाण्यांना मोठी पसंती लाभली होती. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विस्तृत आढावा पुढे घेण्यात आला असला तरी एकमात्र निश्चित की,

वि. स. खांडेकर चरित्र/२६