पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नटवर्य केशवराव दाते यांनी पुण्यात हे नाटक पाहून त्याची नायिका श्रीमती कमलाबाई यांच्या अभिनयाची प्रशंसा करणारे एक पत्र खांडेकरांना लिहुन नव्या नाटकाची मागणी केली होती. यावरून ‘संगीत रंकाचे राज्य' किती यशस्वी होते, याची कल्पना येऊ शकते. खांडेकरांनी प्रतिसाद म्हणून त्यांना आपले ‘मोहनमाळ' नाटक पाठविल्याचे उल्लेख पत्रव्यवहारात आढळतात. केशवराव दाते व खांडेकर यांच्यात सन १९२९ पासून १९७१ पर्यंत पत्रव्यवहार दिसून येतो. त्यातून केशवराव दाते खांडेकरांना नाट्यदोष दाखवीत व मार्गदर्शन करतानाही आढळून येते. वि. स. खांडेकर केशवराव दातेच्या सूचनांचा आदर करीत. एका पत्रात त्यांनी केशवरावांना लिहिले आहे की, "आपले दोषदिग्दर्शन सौम्य झाले आहे, हे मी जाणून आहे; पण निर्जीव स्नेहदेखील जिथे मृदुत्वाबद्दलच प्रसिद्ध आहे, तिथे सुहृदयाचा स्नेह अकारण मृदू व्हावा यात नवल काय? (१) रसहानिकारक रहस्ये,(२) विनोदी पात्रांची लांबण, (३) कोटिक्रमाचा अतिरेक हे तिन्ही दोष कोल्हटकर गडकऱ्यांच्या परंपरेत माझे लेखन वाढल्यामुळे उत्पन्न झाले आहेत. देवल-खाडिलकरांच्या औषधाने हे विष निरुपद्रवी करण्याचा मी यापुढे शक्य तो प्रयत्न करणार आहे."

 वि. स. खांडेकरांचा जन्म व बालपण नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत गेले. देवल,खाडिलकरांसारखे नाट्यक्षेत्रातील पूर्वसूरी व कोल्हटकर-गडकरी यांच्यासारखे त्यांचे समकालीन ज्येष्ठ साहित्यकार यांच्या नाट्यवाचन व रंगभूमीवरील त्यांच्या नाटकांचे सादरीकरण पाहून आपणही नाटककार व्हावे, असे स्वप्न खांडेकर बालपणापासून पाहायचे. ‘शनिमाहात्म्य' वाचल्यानंतर त्यावर आधारित नाटक लिहिण्याचा प्रयत्न खांडेकरांनी केल्याचे उल्लेख आढळतात. पुढे १९१८-१९ च्या दरम्यान पुणे सोडून कोकणात आल्यावर प्रकृति अस्वास्थ्यामुळे ते बांबुळीत होते. निवांतपणा होता. लेखन, वाचनाशिवाय पर्याय नव्हता. त्या वर्षभराच्या कालावधीत व नंतरच्या तीन-चार वर्षांत हौस म्हणून त्यांनी ‘शीलशोधन', ‘मोहनमाळ','शांतिदेवता', ‘मृगलांछन', स्वराज्याचे ताट' यांसारखी नाटके लिहून ती समकालीन नाटकाकारांना अभिप्रायार्थ पाठविली होती, पैकी ‘स्वराज्याचे ताट' नाटक स्त्रीपात्र विरहित होतं. ते १९२५ च्या दरम्यान शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी लिहिलेलं ऐतिहासिक नाटक होतं, तर अन्य चार पौराणिक होती. या सर्वांतून खांडेकरांचा प्रारंभिक लेखनपिंड हा नाटककाराचा होता, हे स्पष्ट होते;

वि. स. खांडेकर चरित्र/२२