पण तो काळ (१९२०-३०) हा मराठी संगीत नाटकांच्या ओहोटीचा असल्याने एक प्रकारे तो संधिकाल होता. नाट्य कंपन्या बंद पडत होत्या. राजाश्रय संपत आलेला. चित्रपटांच्या आगमनामुळे नाटकांचा जनमानसावरील प्रभाव कमी होत चाललेला. त्यामुळे खांडेकर कथा, कादंब-यांकडे वळले असावेत.
‘संगीत रंकाचे राज्य'चा मुख्य विषय स्थानिक स्वराज्य असला तरी त्यात स्त्री-पुरुष प्रीतिभाव, प्रेमातील संयोग-वियोग इत्यादींचं चित्रण प्रभावीपणे आले आहे. हे मूलतः संगीत नाटक असल्याने यात २५ गाणी आहेत. नाटकाची शैली कोटिबाज, विनोदाकडे झुकणारी. Dramatic Irony असं. प्रा.प्र.ना.परांजपेंसारखे समीक्षक त्यांचे वर्णन करतात. खांडेकर जरी नाटककार होऊ शकले नाही तरी नाट्यसमीक्षक म्हणून पुढे त्यांचा लौकिक झालेला आढळतो. एवढे मात्र खरे की, नाटक हा त्यांच्या वाचन व व्यासंगाचा विषय होता. पुढे खांडेकरांनी तो जन्मभर जपला.
विवाह
सांगलीला ‘संगीत रंकाचे राज्य' नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर वि.स.खांडेकर आपल्या आजोळीच मे महिन्याच्या सुट्टीसाठी होते. या काळात सदर नाटकाच्या प्रकाशनाचा योग जुळून आल्याने त्यांनी तिथेच बसून दि. २६ मे, १९२८ रोजी नाटकासंबंधी आपली भूमिका ‘राज्याचा इतिहास' शीर्षकाने लिहिली. बा. अ. भिडे यांची प्रस्तावना वि. स. खांडेकरांनी अगोदरच घेऊन ठेवली होती. (२२ मार्च,१९२८). नाटक मार्गी लागल्याने खांडेकरांची प्रकृती सुधारू लागली होती. दत्तक बहिणीने लग्नाचे टुमणे लावल्याने व वयाने तिशी गाठल्याने लग्न करण्यास खांडेकरांनी तत्त्वतः तयारी दर्शविली. तरी लग्नास होणाच्या हजार-पंधराशे रुपयांच्या खर्चाची त्यांना विवंचना होती. मग स्नेही दत्ताराम घाटे यांच्या भरोशावर हातउसने घेऊन लग्न करण्याचे ठरले.
घरी पत्नी म्हणून येणाऱ्या वधूबद्दल खांडेकरांची स्वतःची अशी धारणा होती. फार शिकलेली नसली तरी चालेल; पण आपण ज्या कोकणातील खेड्यात राहतो, तिथे आपल्यासारख्या शिक्षकाचा ओढग्रस्तीचा संसार सांभाळणारी ती असावी. याच होऱ्याने त्यांनी अन्य स्थळे नाकारून बेळगाव-खानापूरजवळील आसोग्याच्या मणेरीकरांची कन्या मनूचे स्थळ पसंत केले. मे, १९२८ मध्येच आक्का व दत्तक आईच्या संमती व उपस्थितीत आसोग्याला वधूपरीक्षा झाली. १६ जानेवारी, १९२९ रोजी आसोगे मुक्कामीच निवडक पाहुणे व मित्रांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.