पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्याचे असे झाले की, सन १९२६ मध्ये माधवराव जोशी यांनी ‘म्युनिसिपालिटी' हे नाटक लिहिले. ते रंगमंचावरही आले. प्रेक्षकांच्या पसंतीसही ते उतरले; पण त्या नाटकामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची काळी आणि डावी बाजूच तेवढी प्रकाशात आली. या संस्थेचे कल्याणकारी व विकासाचे कार्यही महत्त्वाचं आहे व ते समाजापुढे यायला पाहिजे, असे एका प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्याला वाटले. त्यानं स्पर्धा जाहीर करून एक हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सकारात्मक नाटक लिहिण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रकाशित केली. ती वि. स. खांडेकरांच्या वाचनात आली. त्या वेळी खांडेकरांना २५ रु. पगार होता. त्यांना नाटक लिहिण्याचा झटका आला. त्याच्या मुळाशी अर्थातच बक्षिसाचे प्रलोभन होते. स्पर्धा झाली. बक्षीसपात्र नाटक काही संयोजकांना मिळाले नाही. या परीक्षण मंडळात बेळगावचे नाट्यरसिक व मर्मज्ञ होते भाऊसाहेब सोमण. ते ‘किरात' या टोपणनावाने त्या वेळी लिहीत. ते केशवसुतांचे मित्र व चाहते होते. त्यांना वि. स. खांडेकरांचे नाटक ‘संगीत रंकाचे राज्य' आवडले. त्यामुळे बेळगावचे नाट्यप्रेमी डॉ. के. वा. साठे व पु. ल. ओगले यांना ते रंगभूमीवर यावे, असे वाटले. डॉ. के. वा. साठे यांचा नाट्यकला प्रसारक संगीत मंडळी, सांगलीशी संपर्क व परिचय होता. त्यांच्या शिफारशीवरून ‘संगीत रंकाचे राज्य' नाटक निवडले गेले. त्याचा पहिला प्रयोग सांगलीच्या सदासुख नाट्यगृहात १६ मे, १९२८ रोजी झाला. यात कमलाबाई कामत यांनी नायिका उषाची, तर शि.ह.परांजपे यांनी प्रदोषची भूमिका केली होती.परांजपे त्या वेळी ‘प्रेमसंन्यास'मध्ये 'गोकुळ'ची भूमिका करीत.नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी वि. स. खांडेकर यांचा सत्यबोध हुदलीकर यांच्या हस्ते जरीचा रुमाल व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला होता.

 हे नाटक पुस्तकरूपात प्रकाशित होईल,असे वि.स.खांडेकरांना कधी वाटले नव्हते; पण खांडेकर सांगली हायस्कूलला शिकत असताना त्यांच्या पुढे-मागे वामन वासुदेव अतीतकर नावाचे वर्गमित्र होते.ते बी. ए. होऊन विजापूरकरांच्या समर्थ विद्यालयाचे आजीव सेवक झाले होते. संस्थेचा ‘समर्थ भारत' छापखाना होता पुण्याच्या सदाशिव पेठेत. त्यांना वाटले की, आपण हे नाटक प्रकाशित केले, तर संस्थेस चार पैसे मिळतील. म्हणून त्यांनी ते सचित्र प्रकाशित केले. सन १९२८ ला प्रकाशित ‘संगीत रंकाचे राज्य' या नाटकाची किंमत होती १रुपया. या नाटकास मुरुड-जंजिऱ्याचे बा. अ. भिडे यांची प्रस्तावना आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/२१