Jump to content

पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्याला प्रकट व्हायला आणखी एक माध्यम मिळाले. 'वैनतेय'च्या पहिल्या अंकापासून (२९ ऑक्टोबर, १९२४) ते १९३७ पर्यंत खांडेकरांनी 'वैनतेय'मध्ये नियमित लेखन केले.
 मेघःश्याम शिरोडकर ‘वैनतेय'चे संपादक झाले, तर वि. स. खांडेकर सहसंपादक. वाङ्मय विभागाचे ते मुख्यतः संपादक असले तरी साप्ताहिकाची जी गरज पडेल ते लेखन त्यांनी केले. मुद्रणाची जबाबदारी भाऊसाहेब सप्ते यांच्यावर सोपविण्यात आली होती. साप्ताहिकासाठी ‘वैनतेय' हे नाव वि. स. खांडेकरांनीच सुचविले. याचा अर्थ गरुड. हे नाव निवडताना त्यांच्यापुढे दोन गोष्टी होत्या. दक्षिण कोकण हा डोंगरांनी वेढलेला भूप्रदेश. त्या डोंगराच्या खडकावर बसून सूर्याकडे टक लावून पाहणाऱ्या गरुडासारखा आपणास सामाजिक, राजकीय प्रश्नांचा वेध घेता आला पाहिजे. दुसरे म्हणजे मेघःश्याम शिरोडकर, न. चिं. केळकर, शिवरामपंत परांजपे अशा गुरूंपासून वृत्तपत्रीय प्रेरणा घेऊन आलेले. त्यांच्यापुढे 'केसरी'चा आदर्श होता. केसरी म्हणजे सिंह, प्राण्यांचा राजा, तर गरुड हा पक्ष्यांचा. त्यामुळे ‘वैनतेय' नाव निश्चित करण्यात आले.
 ‘वैनतेय'चे ध्येय, धोरण प्रतिबिंबित करणारा एक श्लोकही खांडेकरांनी लिहिला होता. तो गरुडाच्या चित्राबरोबर प्रत्येक अंकाच्या डोक्यावर छापला जायचा. तो श्लोक असा होता -

"वसे दास्यी माता, नयनसलिली मग्न जनता

असे पंगु भ्राता, अहिकुलछले भीत जनता

नसे साह्या कोणी, अमृत लपले स्वर्गभुवनी

हसे माता आणी, विहगपति शत्रूस बघुनी"

 यातील ‘वसे दास्यी माता' हे भारतमातेच्या पारतंत्र्यास उद्देशून होते. ‘अहिकुल भीत जनता'चा संबंध आपल्याच समाजाचा एक भाग दुसऱ्यावर हुकमत गाजवतो - स्वातंत्र्याप्रमाणे त्यापासून ही मुक्ती मिळावी असे सुचविणारा होता.

 वैनतेय साप्ताहिकाचा पहिला अंक २० ऑक्टोबर, १९२४ रोजी प्रकाशित झाला. सावंतवाडीचे रावबहादूर बापूसाहेब महाराजांचा राज्याभिषेक समारंभ याच दिवशी होता. त्यानिमित्त पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. १९२४ ते १९३२ या कालखंडात वि. स. खांडेकरांनी अग्रलेख, स्तंभलेखन, स्फुट टिपणं तर लिहिलीच; पण प्रसंगी बातमीपत्रेही लिहिली. ‘समुद्रमंथन', ‘गाजराची पुंगी', 'रत्ना प्रसवा', 'गाढवाची गीता’, ‘गाढवापुढे गीता', ‘परिचयाची परडी, ‘कणसाचे दाणे', ‘रानफुले' अशी विविध सदरे खांडेकरांनी लिहिली. 'वाङ्मय विचार विभागाचे संपादन खांडेकर करीत.

वि. स. खांडेकर चरित्र/१९