Jump to content

पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खांडेकरांच्या ते लक्षात आलं. आपले नि विद्यार्थ्यांचे जेवण होताच खांडेकरांनी शेणगोळ्यात हात घातला. मित्र खजील झाला. त्याने प्रतिबंध केला; पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत मात्र आपल्या शिक्षकांच्या आचारधर्म नि आदेशामुळे पाणी आलं. असेच एकदा शाळेची सहल गेली होती. मुलगा समुद्रात बुडतो हे बघून खांडेकर मास्तरांनी समुद्रात मारलेली मुसळी त्यांच्या कर्तव्य व बांधीलकीची परिसीमा होती. एक आजारी विद्यार्थी खांडेकर मास्तरांना बघायचा धोशा लावतो व खांडेकर त्याच्या इच्छेचा आदर करतात. अशा अनेक कहाण्यांतून खांडेकरांचे विद्यार्थिप्रेम सिद्ध होते.
 खांडेकर वेगवेगळ्या प्रसंगी विद्यार्थ्यांसमोर भाषणे करीत. त्यातून विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व रुंदावयाचे. स्नेहसंमेलन, वादविवाद, प्रदर्शन, थोरामोठ्यांच्या भेटी, त्यांचे विद्यार्थ्यांशी हितगुज, पुस्तकांवर चर्चा, ग्रंथालय विकास अशा चतुर्दिक मार्गांनी ते विद्यार्थ्यांना अधिकाधिक देऊन अभ्यासाबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची काळजी घेत. काकासाहेब कालेलकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, न. चिं. केळकर, बा. भ. बोरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा कितीतरी महनीय व्यक्ती त्यांनी शाळेत आणल्या व विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणला.
 गावातील राजकारणात भाग घ्यायचे त्यांनी कटाक्षाने टाळले. तरी काही मंडळी विरोध करीत राहायची. खांडेकरांनी शेवटपर्यंत शाळेस संस्कारकेंद्र म्हणून सुरक्षित व अलिप्त ठेवले. त्यामुळे त्यांची शाळा माणूस घडविणारं संस्कृतिकेंद्र बनून राहिली.
'वैनतेय'चे संपादन

 पुणे सोडून सावंतवाडीला आल्यानंतरच्या काळात वि. स. खांडेकरांनी साहित्यक्षेत्रात लेखन, व्याख्याने, वाचनालय इत्यादी स्वरूपात जे प्रयत्न आणि धडपड सुरू केली होती, त्या १९१९ च्या दरम्यानच्या काळात भेटलेला ध्येयवादी मित्र मेघःश्याम शिरोडकर. त्याने महात्मा गांधींच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शिक्षण सोडून राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली होती. पुढे तो पुण्याच्या राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या टिळक महाविद्यालयातून पदवीधर झाला. परत गावी आला, तेव्हा सावंतवाडी संस्थान होते. लोकांचा कैवार घेणारे, त्यांची दुःख वेशीवर टांगणारं. संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारं वृत्तपत्र असावे असे त्याच्या मनाने घेतले आणि एक साप्ताहिक प्रकाशित करायचे ठरले. खांडेकरांनी त्यांना लेखनसाहाय्य करण्याचे मान्य केले. खांडेकर त्या वेळी आत्मरंजनासाठी काव्य, विनोद, कथा असं लिहीत होतेच.

वि. स. खांडेकर चरित्र/१८