पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजाचा एक फार मोठा श्रमजीवी वर्ग कसा जगतो, कसा राहतो, त्यांची सुख-दुःखे काय असतात याचे प्रत्यक्ष ज्ञान मला नव्हतेच; पण हे सारे जीवन वाङ्मयात प्रतिबिंबित झालेले मी पाहिले नव्हते. त्यामुळे माझे मन अस्वस्थ झाले. आपण अगस्ती ऋषी भले नाही होऊ; पण टिटवी होता आले तरी पुरे, या अपेक्षेने ते कामाला लागले. जग बदलायचा ध्यास त्यांनी घेतला.
 पहिल्या पंधरा दिवसांचा पगार २० रु. हाती आला. नोकरी म्हणून केलेली ती पहिली कमाई होती. तिथल्या निसर्गानं खांडेकरांना भुरळ घातली. सुरूची बाग, भिके डोंगरी, मीठागर, काजी, सारं पाहताना शहरातून आलेला हा तरुण शिक्षक रोमांचित व्हायचा. तांबड्या मातीत रंगलेले जेमतेम गुडघे झाकणारे धोतर, धोतराचा साजेसा तांबूस सदरा, वर जुना पुराणा कोट, डोक्यावर टोपी, डोळ्यांवर चांदीच्या काड्यांचा जाड काचेचा चष्मा, एका हातात छत्री, तर दुसऱ्या हातात पिशवी, पिशवीत पुस्तकं अशा वेशात खांडेकर मास्तरांचा सर्वत्र संचार असायचा.
 शाळेला स्वतःची इमारत नव्हती. इमारत बांधकामासाठी त्यांनी निधी उभारायला सुरुवात केली. खांडेकर मास्तर, आप्पा नाबर, अन्य शिक्षक बाजार, जत्रांमधून फंडाची पेटी फिरवित. घरोघरी जाऊन खांडेकर प्रकृतीची पर्वा न करता उंबरे झिजवू लागले. सभा होत. जुना अनुभव लक्षात घेऊन विरोधही व्हायचा; पण खांडेकरांना ध्येयवादाने पछाडले होते. सन १९२५ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्या वेळी शिक्षकांना ७५-८० रुपये पगार असायचा. त्यां पैकी प्रत्यक्षात निम्माच मिळायचा. त्या काळात प्रत्येक शिक्षकाने इमारत फंडास १००० रुपयांची देणगी देऊन आपली निष्ठा व्यक्त केली होती. त्या काळात इमारतीस २५,००० रुपये खर्च आला होता. त्याचा सविस्तर जमाखर्च खांडेकरांच्या हस्ताक्षरात उपलब्ध असून तो कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयात पाहताना खांडेकरांच्या समर्पण व त्यागाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.

 शिक्षक म्हणून खांडेकर विद्यार्थ्यांना आईसारखा जीव लावित. त्यांच्या विचारांप्रमाणे आचाराचे संस्कारही विद्यार्थ्यांवर घडत. एकदा खांडेकर आपल्या एका विद्यार्थांला घेऊन सावंतवाडीला गेले होते. काम संपेपर्यंत रात्र झाली. सोबत खांडेकरांचे स्नेही होते. त्यांना घरी आग्रहाने जेवण्यास नेलं. मित्र सनातनी होते. जातपात पाळायचे. मित्रांनी विद्यार्थी वेगळा बसविला. दारावरील पायरीवर शेणगोळा ठेवला. संकेत हा की, भोजन झाल्यावर विद्यार्थ्यानं आपली जागा सारवावी.

वि. स. खांडेकर चरित्र/१७