पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या लग्नाचं निमंत्रण खांडेकरांनी साधं पोस्ट कार्ड लिहून आप्तांना धाडलं होतं. ते मोडी लिपीत होतं. सोबत पत्राचा मराठी तर्जुमा दिल्यानं खांडेकरांचं साधेपण उजळतं, उमजतं.
 हे साधेपण अधिक स्पष्ट होतं ते या वस्तुसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या लेखकाच्या पडवीतून! शिरोड्याला असताना खांडेकर आरवलीच्या रेग्यांच्या घरी राहत. दोन सोप्यांचं घर. वरती नळ्याची, अर्धगोलाकार काळी कौलं. भिंती, जमीन सारवलेली. समोर अंगणात तुळशी वृंदावन. कोकणचा हा फिल साऱ्या म्युझियमभर पसरलेला. भिंती सारवलेल्या. छत काजळ धरलेलं. धुरकट. चूल, चिमणीच्या धुरानं माखलेलं. निर्मितीमागील वास्तुशिल्पी व वस्तुसंग्रहालय तज्ज्ञांची कलात्मक दृष्टी केवळ थक्क करणारी व कोकण सजीव करणारी. वि. स. खांडेकरांच्या शेजारीच मराठीतील प्रख्यात कथाकार, नाटककार (ठणठणपाळ) जयवंत दळवी राहत असत. त्यांनी खांडेकरांच्या पडवीचं मनोज्ञ वर्णन केलंय, ‘दर्शनी । पडवी स्वच्छ सारवलेली, त्यावर गादी घातलेली, दोन तक्के भिंतीला टेकलेले. शेजारी आरामखुर्ची, खुंटीला टांगलेला कंदील आणि कोपऱ्यात बांबूची काठी. गादीशेजारी तिवई, त्यावर एक चिमणी आणि पुढ्यात उतरते, बैठे मेज... ज्यावर भाऊ सतत काहीतरी लिहीत, वाचीत बसलेले असत...' यातील भाऊ वगळता सर्व जसंच्या तसं... तेही भाऊ खांडेकरांच्या अस्सल कपडे, जोडे, जाकीट, घड्याळ, पाकीट, चष्मा, पेन्सिल, कागद, इत्यादींसह... वाटतं नुकतंच काहीतरी लिहून क्षणापुरते दरवाजा लोटून आत गेले असावेत. प्रेक्षक खांडेकरमय होणं, लेखक, वाचक, प्रेक्षक एक होणं... क्षणभर भावविभोर होऊन थबकणं, घुटमळणं, विचार करणं होत नाही असा प्रेक्षक, दर्शक विरळा! लेखक जिवंत करण्यातच या वस्तुसंग्रहालयाचं सार्थक!

 एक पाऊल पुढे टाकत प्रेक्षक एकदम जातात चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत! खांडेकरांनी मराठी, हिंदी, तमिळ, तेलगूत एक नाही ‘दोन नाही' तब्बल अठ्ठावीस पटकथा लिहिल्या, असंख्य गाणी, संवादही! खांडेकरांच्या चित्रपटांची छायाचित्रे, कथापुस्तिका सारं अस्सल! खांडेकरांचे चित्रपट ज्या कादंबऱ्यांवर बेतलेले असायचे, त्या कादंबऱ्या लोक सिनेमा तिकिटाबरोबर खरेदी करीत हे ऐकून प्रेक्षक अचंबित होतात ते कालप्रगल्भ समाजजीवन अनुभवून! ही असते अभिरुची, चोखंदळपणा व जगण्याची खानदानी नजाकत! वस्तुसंग्रहालयात सिनेमा पाहण्याचीही सोय असल्याने हे संग्रहालय एकाच वेळी दोन भिन्न शतकांत अनुबंध निर्माण करीत भूतकाळाला वर्तमानाशी आपसूक जोडते.

वि. स. खांडेकर चरित्र/१५५