पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पगारपत्रकावर असलेली व्हिक्टोरिया राणीची तिकिटे व तुटपुंजा पगार या सर्वांतून त्या वेळचं शिक्षण जगत जिवंत होतं. विद्यार्थी थोराड असत. शिक्षक व विद्यार्थी सर्वच टोपी, सदरा, धोतर, कोट असा वेश परिधान करीत. विद्यार्थी उभे व शिक्षक खुर्चीवर बसलेले हाच काय तो दोघांतील फरक. हे सर्व चित्र आज पाहत असताना पूर्वी शिक्षण क्षेत्र किती प्रतिकूल होतं व शिक्षक कसे राष्ट्रीय भावनेने शिकविण्याचे कार्य व्रत, सतीचं वाण म्हणून करीत हे जाणवून प्रेक्षक शहारतात व अंतर्मुख होतात; तर आजचे शिक्षक खजिल! अशी प्रतिक्रिया निर्माण करणंच या वस्तुसंग्रहालयाचा उद्देश होता.
 'केसरी'कार लोकमान्य टिळक, ‘सुधारक'कार गोपाळ गणेश आगरकर, ‘निबंधमाला'कार विष्णुशास्त्री चिपळूणकर 'काळ'कर्ते शिवराम महादेव परांजपे प्रभृतींच्या लेखन व पत्रकारितेमुळे महाराष्ट्रात राष्ट्रीय बाण्याची वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके निघण्याची, प्रकाशित होण्याची समृद्ध परंपरा महाराष्ट्रास लाभल्याने त्याचे लोण सावंतवाडीसारख्या तत्कालीन छोट्या संस्थानातही येऊन न पोहोचले असते तरच आश्चर्य!
 ‘खींचो न कमान को, न तलवार निकालो।।
 जब तोप मुकाबिल हो, तो अखबार निकालो।।'
सारख्या ओळी त्या वेळच्या कृतिशील तरुणांना प्रेरणा देत होत्या. यामुळे मेघश्याम शिरोडकरांनी एक साप्ताहिक सावंतवाडीला सुरू करण्याचं ठरविल्यावर त्यांनी वाङ्मय विभागाचे संपादक म्हणून खांडेकरांची निवड केली असली तरी खांडेकर बातम्या, सदरे (स्तंभ), पुस्तक परिचय, अग्रलेख, स्फुट असं सर्वंकष लेखन करीत. त्या सर्वांचे प्रातिनिधिक दर्शन, वाचन करताना प्रेक्षक हेलावून जातो व खांडेकरांच्या राष्ट्रीय चळवळीतील अक्षर योगदानापुढे नतमस्तक होतो. प्रेक्षकांत वर्तमानकाळात असा राष्ट्रीय बाणा निर्माण करण्याची प्रेरणा या प्रदर्शनामागे स्पष्ट होते.

 वि. स. खांडेकरांचं पहिलं प्रकाशित पुस्तक एक नाटक होतं 'संगीत रंकाचे राज्य' (१९२८). या नाटकाचं वैशिष्ट्य असं की, ते प्रथम रंगमंचावर सादर झालं आणि नंतर त्या नाटकाला पुस्तकरूप आलं. या नाटकाची मनोवेधक छायाचित्रे आपणास विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या नाटकाचं भान देतात. हे नाटक यशस्वी झालं आणि खांडेकरांचे दोन्हीचे चार हात झाले. आपल्या पत्नीचं त्यांनी ‘उषा' नाव ठेवलं. “संगीत रंकाचे राज्य'ची नायिका उषाच होती. बहुधा ती मनपसंतीची खूणच. या सर्वांतून खांडेकरांचं व्यक्तिमत्त्वही स्पष्ट होतं.

वि. स. खांडेकर चरित्र/१५४