पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाने दोन कामे केली. एक, विद्यापीठातील सर्व भाषा विभागांसाठी बांधलेल्या इमारतीचे, भाषाभवनाचे अनौपचारिक उद्घाटन माझ्या नि तत्कालीन कुलगुरू डॉ. मु.ग.ताकवले यांचे संयुक्त हस्ते करून त्या इमारतीचे ‘वि.स. खांडेकर भाषा भवन' असे नामकरण केले. त्या दिवशी शिवाजी विद्यापीठाने रजत स्मृती दिनाचे औचित्य साधून 'खांडेकरांचे अप्रकाशित साहित्य' विषयावर माझे भाषण आयोजित केले होते. भाषणाच्या ओघात मी या भवनात वि. स. खांडेकरांचे स्मृती संग्रहालय उभारणे औचित्यपूर्ण ठरेल, असा विचार मांडला होता. तो शिवाजी विद्यापीठाने उचलून धरला. खांडेकर कुटुंबीयांनी आणि विशेषतः खांडेकरांच्या कन्या मंदाताईंनी त्यासाठी सर्व ते साहाय्य, साधनं देण्याचे मान्य केले. याचे प्राथमिक श्रेय शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन मराठी विभागप्रमुख व लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांना द्यायला हवे.

 स्मृती संग्रहालयाची कल्पना माझ्या मनात येण्याचे हेही कारण होते. सन १९९७-९८ हे ‘वि. स. खांडेकर जन्मशताब्दी वर्ष' होते. त्या वर्षात जया दडकर यांनी केलेली ‘वि. स. खांडेकर वाङ्मय सूची' माझ्या हातात आली. ती प्रकाशित होऊन तप उलटून गेले होते. त्यात वि. स. खांडेकरांच्या अप्रकाशित, असंग्रहित साहित्याची नोंद आणि सूची होती. हे सर्व एकत्र करण्याची आणि त्याची पुस्तकं करण्याची कल्पना माझ्या मनात आली. ते सारं साहित्य मी शोधू लागलो, मिळवू लागलो. मंदाताई खांडेकरांनी त्यांच्या संग्रही असलेले सारे साहित्य देण्याची तयारी दर्शविली, तसा माझा उत्साह वाढला. सुमारे ३००० पानं छापून होतील असा मजकूर मी जमविला. महाराष्ट्रातील सारी ग्रंथालयं, विद्यापीठं, वर्तमानपत्रांच्या कचेऱ्या जुन्या बंद झालेल्या मासिकांची दप्तरं, व्यक्ती, संस्था असा शोध घेत सारा महाराष्ट्र पालथा घातला. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. द. ना. धनागरे यांनी यासाठी सन १९९७-९८ मध्ये पत्र देऊन मोठी मदत केली होती. एव्हाना ‘वि. स. खांडेकर रजत स्मृती वर्ष' तोंडावर आलं होतं. मी उपलब्ध मजकुरातून २५ पुस्तकं होतील, अशी योजना आखली. मंदाताई खांडेकर,अनिलभाई मेहता, सुनील मेहता यांनी प्रकाशनास संमती दर्शविली.या साऱ्या शोधात वि.स.खांडेकरांच्या जीवनासंबंधी अनेक संदर्भसाधने, हस्तलिखिते, छायाचित्रे, खर्डे, दैनंदिनी, मानपत्रे, पत्रे, मुलाखती, ध्वनिफिती, चित्रफिती, चित्रपट साधने (पोस्टर्स, बॅनर्स, जाहिराती, पुस्तिका, गाणी, पत्रव्यवहार इत्यादी) माझ्या हाती आली होती.

वि. स. खांडेकर चरित्र/१४७