पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(ऐ) वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय : प्रेरणा आणि दृष्टी
 मराठी भाषा व साहित्यास पहिला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे पद्मभूषण वि. स. खांडेकर हे सर्व भारतीय भाषांत मानाचे स्थान मिळविलेले श्रेष्ठ साहित्यिक होते. त्यांनी आपल्या कथा, कादंबरी, लघुनिबंध, रूपककथा, वैचारिक लेख,व्यक्तिवाङ्मय, व्यक्तिचित्र, चरित्र, आत्मकथा, भाषांतर, काव्य, संपादन, पटकथा, भाषणे, मुलाखती, विनोदी लेख, नाटक असे विविधांगी लेखन करून मराठी साहित्यात केवळ मोलाची भरच घातली असे नाही, तर त्यांनी आपल्या भाषा, शैली, विचारांचा खोल ठसा मराठी साहित्यावर उमटविला. जीवनासाठी कला' विचाराची भूमिका घेऊन केलेलं त्यांचं समग्र लेखन म्हणजे मानवी जीवनातील प्रश्नांचा समाजशील वेध असायचा. इंग्रजीतील शेक्सपीअर, रशियातील मॅक्सिम गॉर्की, बंगालीतील शरद्च चटर्जी, तर हिंदीतील प्रेमचंद म्हणता येईल असे त्यांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व, आज त्यांचा लेखनकाळ सरून सुमारे चार दशकांचा कालावधी लोटला तरी त्यांच्या साहित्यवाचकांचा ओघ क्षीण झाला नाही. त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. याचे कारण त्यांच्या साहित्यविचारात असलेले जीवनमूल्य, संस्कार, शिक्षण, जीवनदृष्टी देणारे त्यांचे साहित्य लोक स्वास्थ्याने वाचणे पसंत करतात, ते त्यांच्या साहित्यात असलेल्या पिढी घडविण्याच्या सामर्थ्यामुळे.

 अशा साहित्यसम्राटाचे एक स्मृती संग्रहालय उभारण्याचा संकल्प शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरनं एकविसाव्या शतकाच्या प्रारंभिक वर्षातच म्हणजे सन २००१ ला सोडला. २ सप्टेंबर, २००१ रोजी वि. स. खांडेकरांच्या निधनाला २५ वर्षे पूर्ण होत होती. ते वर्ष ‘खांडेकर रजत स्मृती वर्ष' होते.

वि. स. खांडेकर चरित्र/१४६