पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शिवाजी विद्यापीठाने असे संग्रहालय उभारण्यामागे विद्यापीठाच्या स्थापनेपासून वि. स. खांडेकरांचा घनिष्ठ संबंध होता. मराठी ज्ञानभाषा व्हावी, अशी खांडेकरांची भूमिका होती. तत्कालीन मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांनी स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी हे राज्य मराठ्यांचे की मराठीचे अशी पृच्छा केल्यानंतर निःसंदिग्ध शब्दांत 'मराठीचे' असं उत्तर देऊन कृतिशील कार्यक्रमाचा धडाका लावला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या पाठोपाठ त्यांनी मराठी भाषा ज्ञानभाषा करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा संकल्प सोडला होता. या विद्यापीठाच्या निर्मितीच्या वेळी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्यांत वि. स. खांडेकरांचा समावेश आवर्जून केला होता. शिवाजी विद्यापीठाच्या अनेक समारंभांत वि.स.खांडेकरांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले जायचे. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात वि. स. खांडेकरांच्या साहित्याचा अंतर्भाव असायचा. साहित्य अकादमीचं महदत्तर सदस्यत्व (फेलोशिप) खांडेकरांना द्यायचे जाहीर झाल्यानंतर ते स्वीकारण्यासाठी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते नवी दिल्लीस जाऊ शकत नव्हते. अकादमीने ते कोल्हापुरात बहाल करायचे ठरल्यावर शिवाजी विद्यापीठाने पुढाकार घेऊन तो समारंभ दिमाखदार सोहळ्यात पार पाडला. जन्मशताब्दी सोहळाही पुढाकार घेऊन साजरा केला. खांडेकरांचं स्मृती तिकीट निघावं म्हणून पाठपुरावा, पत्रव्यवहार, प्रकाशन सोहळा हे सर्व विद्यापीठानं केलं. या पाश्र्वभूमीवर स्मृती संग्रहालय उभारणं सुसंगतच म्हणावं लागेल.

 या संकल्पित वस्तुसंग्रहालयाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने एक प्रकल्प समिती नेमली.तीन भाषा विभाग प्रमुखांसह त्यात माझाही समावेश केला. सर्वश्री. डॉ. चंद्रशेखर जहागीरदार (इंग्रजी), डॉ. रवींद्र ठाकूर (मराठी), डॉ. अर्जुन चव्हाण (हिंदी) यांनी पहिल्या सभेतच या समितीचे समन्वयक बनवून माझा गौरव केला. पुढे आम्ही वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पं. ना. पोतदार व वास्तुशिल्पी विजय गजबर यांच्या साहाय्याने एक कृती प्रकल्प सादर केला. त्याला शिवाजी विद्यापीठाने तत्त्वतः मंजुरी देऊन ३.५ लाख रुपये मंजूर केले आणि अचानक डॉ.मु.ग.ताकवले यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त कानी आले. ते,मी,प्रकुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वृत्त आले त्या दिवशी एकत्र होतो.अनौपचारिक गप्पांत मी संग्रहालयाबद्दल काळजी व्यक्त केल्यावर डॉ. ताकवले यांनी संग्रहालय स्थापन केल्याशिवाय पदभार सोडणार नाही, असे आश्वासन दिले, पण त्यांच्या हातांत चोवीस

वि. स. खांडेकर चरित्र/१४८