पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झालेली. मी खांडेकरांनीच निवडून दिलेल्या काही कथांचे हिंदीत अनुवाद केले. 'वि. स. खांडेकर की श्रेष्ठ कहानियाँ' नावाने ते प्रकाशित झाले. इतकेच नव्हे तर भारत सरकारचा उत्कृष्ट अनुवाद पुरस्कारही त्याला लाभला. माझं बळ वाढलं. मी खाडेकरांची शेवटची कादंबरी ‘सोनेरी स्वप्नं भंगलेली...'चा हिंदीत अनुवाद केला. त्या अनुवादाचं एक आगळं वैशिष्ट्य होतं. खांडेकरांच्या अचानक निधनाने ती अपूर्ण राहिलेली; पण घरी चर्चा होती. लेखनिकांशी चर्चा असायची. त्या आधारे ती मी पूर्ण करून अनुवादली. त्यामुळे मराठीत ती अपूर्ण असली तरी हिंदी वाचक ती पूर्ण वाचतात. तिचं हिंदीत चागलं स्वागत झालं. 'स्वप्नभंग'नंतर ‘ठंडी हवा और अन्य कहानियाँ' नावाने ‘श्रेष्ठ कहानियाँ ची दुसरी आवृत्ती बाजारात आली होती. एव्हाना १९९५ साल उजाडलं होतं व खांडेकर जन्मशताब्दी तोंडावर आलेली. जन्मशताब्दीनिमित्त काय करता येईल असा विचार करताना लक्षात आलं की, खांडेकरांचे कथा, कादंबरी, रूपककथांचे अनुवाद हिंदीत आहेत; पण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील प्रगल्भ नि कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ रूपककथा अद्याप हिंदीत गेलेल्या नाहीत. मी अशा रूपककथा ‘सारिका', 'भाषा', 'समकालीन भारतीय साहित्य'सारख्या मान्यवर नियतकालिकांकडे भाषांतरित करून पाठविल्या. त्या भाषांतरांचेही उत्साहवर्धक स्वागत झाले. मग मी जन्मशताब्दी वर्षात ‘शांति' या रूपककथांचा संग्रह हिंदीला दिला.

 आता मला खांडेकरांचा 'नाद'च लागला होता. माझ्या लक्षात आलं की, मराठीत खांडेकरांचे विपुल साहित्य प्रकाशित असलं तरी बरंच साहित्य अप्रकाशित, असंकलित आहे. एव्हाना सन २००० उजाडलं होतं आणि खांडेकरांच्या निधनाला बघता-बघता २५ वर्षे होणार होती. २००१२ हे ‘खांडेकर रजत स्मृतिवर्ष' होतं. मी अप्रकाशित, असंकलित साहित्य वाचून, अभ्यासून, दुर्मीळ लेखन मिळवून २५ ग्रंथ प्रकाशित करण्याचा संकल्प केला. या ओळी लिहीत असताना मला सांगण्यास आनंद वाटतो की, मी तो पूर्ण केला. १ कादंबरी, ४ कथासंग्रह, ४ लघुनिबंधसंग्रह, ३ वैचारिक लेखसंग्रह, १ मुलाखत संग्रह, २ आत्मकथनात्मक पुस्तके, १ पटकथासंग्रह, ३ व्यक्तिलेख संग्रह, १ रूपककथा संग्रह, अशी २० पुस्तके प्रकाशित असून बहुतेकांच्या किमान दोन-तीन आवृत्त्या आल्या आहेत. अजून १ विनोदी लेखसंग्रह, २ समीक्षा संग्रह, २ वृत्तपत्रीय लेखसंग्रह, २ कादंबऱ्या, १ प्रस्तावना संग्रह, १ परीक्षण संग्रह; शिवाय बृहद् स्मारक ग्रंथ संपादित असून लवकरच ते सारे साहित्य उत्सुक वाचकांच्या हाती

वि. स. खांडेकर चरित्र/१३६