पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(ऊ) वि. स. खांडेकर साहित्य : अश्वत्थाम्याची जखम
 वि. स. खांडेकरांबद्दल लिहिताना कुसुमाग्रजांनी त्याचं वर्णन ‘दुर्मीळ आर्ष अधिकार असलेला समाजपुरुष' म्हणून केलं आहे. ते खरं आहे. खांडेकरांचं समग्र जीवन आणि साहित्य म्हणजे विचार आणि व्यवहार यांची अभिन्नता. मी शाळकरी वयात असताना खांडेकरांच्या संपर्कात आलो. संस्कारक्षम शिक्षण देण्याच्या इराद्याने त्यांनी कोल्हापुरात आंतरभारती विद्यालय सुरू केलं होतं. त्यातील पहिल्या विद्यार्थ्यात मी होतो. पहिल्याच वर्षी मी शाळेच्या विद्यार्थी मंत्री मंडळात वादविवाद मंत्री झालो होतो. एका कार्यक्रमाला खांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. त्यांना आणायला आमचे मुख्याध्यापक जी. एस. गोंधळी व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी रिक्षा घेऊन त्यांना आणण्यासाठी राजारामपुरीच्या ‘मुक्ताश्रम'मध्ये गेल्याचं आठवतं. रिक्षा तेव्हा कोल्हापुरात नुकतीच सुरू झाली होती. एरव्ही खांडेकर टांग्याने वा पायी जात-येत असत. रिक्षात बसल्यावर ते आमच्या सरांशी बोलत होते. टांगा जाऊन रिक्षा येणं म्हणजे काय ते समजावत होते. गती, यंत्र, बेकारी, पोटावर पाय असं काही-बाही बोलत होते. आज माझ्या लक्षात येते, ती त्या वेळी ऐकलेल्या हितगुजाची संगती. काळसुसंगत लेखन, वाचन, बोलणं यांमुळे कळत्या वयात मी त्याच्या निकट सान्निध्यात आलो, ते त्यांच्याच - त्या माझ्या शाळेत शिक्षक होऊन. परत तोच अनुभव. मूल्य आणि व्यवहार यांच्या फारकतीविरुद्ध मी बंडाचा झेंडा घेऊन उभारलो, तेव्हा खांडेकरांचं तत्त्वांच्या पाठीशी उभारणं, यामुळे लेखक अधिक एक सच्चा माणूस म्हणून मी त्यांच्या मोहात पडलो.

 आणीबाणीच्या काळातच खांडेकर निवर्तले. मी प्राध्यापक झालो. त्यांच्या साहित्याच्या अनुवादाचं गारुड माझ्यावर असण्याचा तो काळ! नुकताच हिंदीत पीएच. डी. झालेला मी. काही पुस्तकं दिल्लीहून प्रकाशित

वि. स. खांडेकर चरित्र/१३५