पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येईल. वि. स. खांडेकरांच्या मी घेतलेला हा पुनर्शोध! यात माझ्या हाती अनेक दुर्मीळ चिजा, कागदपत्रे, पत्रव्यवहार आला. खांडेकर कुटुंबीयांनी मूळ पुरस्कार (अकादमी, ज्ञानपीठ, पद्मभूषण) मानपत्रे, रोजच्या वापरातील वस्तू असं अमूल्य वारसाधन, ऐवज देऊ केल्याने शिवाजी विद्यापीठात भारतातील लेखकाचं पहिलं शास्त्रोक्त वस्तुसंग्रहालय उभारलं गेलं. आता तर संग्रहालय निर्मिती हा माझा छंदच होऊन बसला आहे. महर्षी कर्वे स्मृती संग्रहालय, हिंगणे (पुणे), साने गुरुजी स्मृती संग्रहालय, राष्ट्रीय स्मारक केंद्र, वडघर (रायगड), कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालय, बार्शी, यशवंतराव चव्हाण स्मृती संग्रहालय, नाशिक यांची उभारणी, संशोधन, साधनसंग्रह निर्मितीत माझी छोटी-मोठी भूमिका राहिली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक संग्रहालय उभारणीच्या दृष्टीने संशोधन, साधनसंग्रह सुरू आहे.
 महर्षी कर्वे, साने गुरुजी, कर्मवीर जगदाळे, यशवंतराव चव्हाण आणि साहित्यिक खांडेकर ही सारी मंडळी, त्यांचे कार्य, जीवन, विचार आणि मी यांत मला माझ्या जीवनशल्यांची पूर्तता आढळत आली आहे आणि या सर्वांचा एकमेकांशी भावात्मक ऋणानुबंध आहे. हा परीघ रुंदावून यात मला आवर्जून महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे घ्यावेसे वाटतात. अनाथ, निराधार, वंचित, उपेक्षित, दलित, विधवा, परित्यक्त, अनौरस, कुमारी माता यांचे या सर्वांनी केलेलं उन्नयन त्याशी माझ्या जीवनाची नाळ जोडलेली आहे, असे आतून कुठून तरी वाटत राहते। अन् मी धांडोळा घेत, हंगत, पुनर्शोध घेत भटकत, पायपीट, हमाली, पदरमोड करीत राहतो. हे सारं करताना मी कुणाचा रुपया घेतलेला नाही... मिळवलेला नाही, हे सांगितलं पाहिजे.

 वि. स. खांडेकरांचे जीवन, साहित्य, विचार, कार्य अभ्यासत असताना माझ्या लक्षात येते की, खांडेकर मानवी जीवनाचे विचक्षण वाचक, टीकाकार, भाष्यकार आहेत. ते जीवनचिंतक, तत्त्वज्ञ आहेत. त्यांचं साहित्य मला काय देतं, शिकवतं, सांगायचं झालं तर त्यांचेच शब्द उसने घेऊन म्हणावं लागेल की, 'वाङ्मय हे विचार, कल्पना, मनोरंजनाचे क्षेत्र नसून ते जीवनकर्तव्य शिकविणारे साधन होय.' या वाक्याचा भुंगा माझ्या कानांत गुंजारव करीत असतो आणि मग मी अनाथांचे संगोपन, पुनर्वसन, शिक्षण, सुसंस्कारासंबंधी छोटी-मोठी लुडबूड करीत राहतो. कधी बालकल्याण संकुल उभार. कधी राज्याचं बालक धोरण बनव. कैलास सत्यार्थीबरोबर बालमजुरीविरोधी ग्लोबल मार्च काढ.

वि. स. खांडेकर चरित्र/१३७