पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ललितसाहित्याचा चर्मोत्कर्ष दर्शविणाऱ्या ठरतात.

 प्रा. ना. सी. फडके यांनी ‘गुजगोष्टी' रूपात लघुनिबंध लिहिण्यास प्रारंभ केला. जनक म्हणून त्यांचे महत्त्व आहेच; पण हा साहित्यप्रकार ललित अंगांनी विकसित करण्याचे श्रेय मात्र वि. स. खांडेकरांनाच द्यावं लागतं. खांडेकरांच्या हयातीत ‘वायुलहरी' (१९३६) ते 'झिमझिम' (१९६१) असे अकरा लघुनिबंध संग्रह प्रकाशित झाले. त्यातून २०० लघुनिबंध संकलित झाले होते. त्याशिवाय सुमारे ७० लघुनिबंध असंकलित राहिल्याने एका परीने अचर्चित राहिले. या लघुनिबंधांचे संग्रह आजमितीस जिज्ञासू साहित्यरसिक, वाचक, अभ्यासक, संशोधकांना उपलब्ध असून ते ‘रानफुले (२००२), ‘अजुनि येतो वास फुलांना' (२००३), ‘मुखवटे' (२००४), ‘सांजसावल्या' (२००४) शीर्षकांनी प्रकाशित आहेत. विशेष म्हणजे या सर्व नवसाहित्याच्या चार-पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्याने त्यांना नवा वाचकही पसंत करतो असे दिसते. सन १९२७ ला वि. स. खांडेकरांनी आपला पहिला लघुनिबंध ‘निकाल द्या' (How's that) सावंतवाडीहून प्रकाशित होणाऱ्या व मेघश्याम शिरोडकर संपादित असलेल्या साप्ताहिक ‘वैनतेय'मध्ये ‘रानफुले' सदरात प्रकाशित केला. सन १९७६ पर्यंत ते अव्याहतपणे लघुनिबंध लिहीत राहिले. त्यांचा शेवटचा प्रकाशित लघुनिबंध म्हणजे ‘शब्द आणि शब्द' तो ‘अरुंधती' मासिकाच्या सन १९७६ च्या दिवाळी अंकात प्रकाशित आहे. याशिवाय काही अप्रकाशित लघुनिबंध माझ्या साहित्यिक उत्खननात हात आले. तेही ‘सांजसावल्या'मध्ये वाचण्यास उपलब्ध आहेत. मराठी लघुनिबंधांची ललित वैशिष्ट्ये या लघुनिबंधांत आढळतात. रस, रंग, रूप, गंध, संगीत आणि संवेदनांनी ओथंबलेले हे। लघुनिबंध म्हणजे मराठीचे देशीकार लेणेच. या रानफुलांना गावरान मेव्याचं महत्त्व. डोंगरची मैना म्हणून बिरूद मिरवणारी करवंद मिठास असतात तशी तुरटही. ती मिळवायला काटे टोचून घ्यावे लागतात. हे लघुनिबंध आपल्या रोजच्या छोट्या घटनांमागील व्यापक जीवनार्थ सांगतात. विसंगतींवर बोट ठेवतात. न सांगता येणारी कळ व्यक्त करतात. त्या जुन्या घटनांचे नवे अर्थ अधोरेखित करीत समाजमनाची मशागत करतात. ललित साहित्य नुसते चमत्कृती घेऊन नसते येत. ते पुरोगामी समाज परिवर्तन घडविते. ते नुसतं सुंदर आणि कलात्मक नसते. आशयाच्या अंगानी उत्तुंग भरारी घेणारे असते. टेनिसनच्या शब्दांत सांगायचं तर, 'The old order change the yielding place to new one' असं असलेलं खांडेकरांच्या लघुनिबंधांचं सामर्थ्य व मर्म म्हणजे निबंधसौंदर्याचा नजराणा. विशिष्ट आत्मनिष्ठता

वि. स. खांडेकर चरित्र/१३०