पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘मराठ्यांची भाऊबीज', 'भाऊबीज' अशा चार कथा का लिहाव्यात तर त्याचं कारण त्यांना बहीण नसणे. विविध वृत्त'मध्येही त्यांची ‘भाऊबीज व प्रगती' कथा प्रकाशित आहे. लेखकाचं लेखन एका अर्थाने व्यक्तिगत शल्याचे उन्नयन असते हे यावरून उमजते. ‘ते दिवस, ती माणसे'मधील ‘आक्का' वाचली की हे लक्षात येतं. या साऱ्या नवकथांतून खांडेकरांच्या कथांची एक चित्राकृती (Pattern) किंवा आकृतिबंध लक्षात येतो. ‘सरत्या सरी'मधील कथा खांडेकरांनी दृष्टी गमावल्यावर लिहिल्या खऱ्या; पण त्या लेखकाच्या चर्मचक्षूपेक्षा अंतर्चक्षुच प्रबळ, प्रभावी असतात हे सिद्ध करणाच्या ठरल्या. कोल्हटकर, गडकरी, गुर्जर पठडीतील कथालेखनाने सुरू झालेला खांडेकरीय कथांचा प्रवास उत्तरार्धात ओ हेन्री, मोपाँसा, चेकॉव्ह, गॉल्सवर्दी, टॉलस्टॉय, खलील जिब्रान, मॉमशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, हे पाहता खांडेकर एक ललितकथालेखक म्हणून आत्मनिष्ठ, मनस्वी लेखन करणारे, अलंकार, प्रतीक, मिथकांद्वारे नवविचारांचे सर्जन करणारे तद्वतच कथातंत्राचे नवनवे प्रयोग करणारे (उदाहरणार्थ त्यांच्या रूपक कथांचे योगदान) म्हणुन युगप्रवर्तक कथाकार सिद्ध होतात. मानवी जीवनाची चिकित्सा करीत ते परिष्कृत करण्याचा या कथाकाराचा ध्यास एका बहुश्रुत कलाकाराचा होता.

मराठी साठोत्तरी कथेत कलात्मक योगदान देणा-या ललित, मनोहारी कथा म्हणून खांडेकरांच्या ज्या रूपककथांचा उल्लेख करण्यात येतो, त्यांचं प्रतिबिंब ज्यांना पाहायचे असेल त्यांना सन १९५९ ते १९७६ या कालखंडात लिहिलेल्या रूपककथांचा संग्रह ‘क्षितिजस्पर्श' (२००२) वाचायला हवा. या कथा म्हणजे गद्य काव्यच. अल्पाक्षरी तरी अपरासृष्टीत नेणाऱ्या. परिणामकारकता, संयम, ध्वनिवैविध्य, विशाल दृष्टिकोन, प्रज्ञा आणि प्रतिभेचा संगम म्हणून या कथांचं ललितसौंदर्य आगळं. निसर्ग आणि माणूस यांचा मिलाफ साधणाऱ्या या कथांची सारी क्षमता त्यातील ‘ध्वनितात' सामावलेली असते. तेच या कथांचं खरं ललितसौंदर्य. त्या तुम्हास सहज नाही वाचता येत. वाचून सोडून दिल्या असं या कथांचं होत नाही. त्या जीवन व कला दोन्ही अंगांनी वाचकास चमत्कृत करतात नि अंतर्मुखही. आशय आणि अभिव्यक्तीचं अद्वैत ज्यांना अनुभवायचं त्यांनी या कथा एकदा वाचल्या पाहिजेत. विशेषतः या संग्रहातील ‘कवी आणि मुंगी', ‘वृद्ध प्राजक्त', 'बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी’, ‘मृत्यू' सारख्या रूपककथा प्रा. बा. सी. मर्ढेकरांनी वर्णिलेल्या वाङ्मयीन आत्मनिष्ठा (sincerity), तादात्म्य आणि महात्मता (sense of value) निकषांवर मराठी

वि. स. खांडेकर चरित्र/१३०