पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिहिलेल्या कादंबरीतील खांडेकरांची शब्दकळा कलात्मक, सूचक व समर्पक म्हणायला हवी. 'रामराज्य', ‘स्थितप्रज्ञ', ‘आझाद स्टोअर्स', ‘कम्युनिस्ट' शब्दांतून कालबोध, तत्त्व, गर्भितार्थ सूचित करण्याचं खांडेकरांचं कौशल्य कलात्मक, वाक्यांतून अलंकार पेरणी ही खांडेकरी भाषेची स्वतःचीच ओळख. संवादात 'हॅलो ललिता' म्हणत खांडेकर ही कादंबरी काळापुढे पन्नास वर्षे नेतात. (त्या काळात असं म्हणण्याची शामत व परंपराही नव्हती!) नायिका ललिताचं चित्रण म्हणजे संवेदनात्मक अनुभूतिपूर्ण शब्दचित्र! त्याचे लालित्य वर्णन करायचे तर ती आर्षप्रतिभाच (Archetypal Image) समाजजीवनातील प्रश्नांचा संबंध विधिशास्त्रास जोडून खांडेकर आपल्या या कादंबरीच्या निर्देशात्मक कक्षा रुंदावतात. या कादंबरीत आशय आणि अभिव्यक्तीची अभिन्नता कादंबरीस भावपातळीवरही एका नव्या उंचीवर आणून ठेवते व वाचकांच्या अपेक्षा उंचावते, परिष्कृत करते. हेच या कादंबरीचं कालोचित यश म्हणायला हवं.

 रजत स्मृती प्रकल्पातून वि. स. खांडेकरांचे चार कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. स्वप्न आणि सत्य' (२००२), ‘विकसन' (२००२), ‘भाऊबीज' (२००३) आणि ‘सरत्या सरी' (२००३) हे ते चार कथासंग्रह असून वाचकांना त्यातून सुमारे ४0 नव्या कथा उपलब्ध होतात. सन १९३० ते १९७६ अशा सुमारे पाच दशकांच्या काळातील या कथा. मराठी समीक्षेत आणि संशोधनात अचर्चित या कथांचं ऐतिहासिक महत्त्व आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘स्वप्न आणि सत्य'मधील ‘स्वप्नातले स्वप्न' कथेचं देता येईल. ही मूळ कथा 'यशवंत' मासिकाच्या ऑक्टोबर - नोव्हेंबर १९३२ च्या अंकात प्रकाशित झाली होती. कथा आहे तत्कालीन हिंदू-मुस्लिम दंग्यांवर आधारित. या कथेचा उत्तरार्ध म्हणजे खांडेकरांची गाजलेली चकोर आणि चातक' ही रूपककथा. आजवरच्या सर्व मराठी प्राध्यापकांनी ती केवळ रूपक, प्रतीक, मिथक, सौंदर्य अंगांनी तिची चर्चा, समीक्षा, संशोधन अभ्यास केला; पण 'स्वप्नातले स्वप्न' ही मूळ कथा वाचली की तिचा सामाजिक, राजकीय संदर्भ उलगडतो. वि. स. खांडेकर मराठीतील श्रेष्ठ ललित कथाकार ठरतात ते त्यांनी रूपक, प्रतीक, मिथक इत्यादी माध्यमांतून केलेली वर्तमानाची चिकित्सा अन् तीपण कलात्मकरित्या. पण त्यांच्या कलेला सामाजिक किनार असायची, राजकीय संदर्भ असायचे, याची फारशी चर्चा ययाति' कादंबरीचा अपवाद वगळता झाली नाही. विषयाच्या अंगांनी पाहायचे झाले तर 'भाऊबीज' या एका सण, विषयावर ‘आंधळ्याची भाऊबीज', 'फकिराची भाऊबीज',

वि. स. खांडेकर चरित्र/१२८