पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शाळेत मुलींची संख्या लक्षणीय होती.म्हणून प्रयत्न करणाऱ्या खांडेकरांना ग्रामस्थ परभारे म्हणत राहायचे, "ह्यो आमका समाजना नाय, पण नयीन आसा. बरां लागतां! ह्यो मास्तर पोरांबरोबरी पोरींकय शिकूक सांगताहा मरे! मुलींका शाळेत धाडा म्हणताहा! ह्या खांडेकर मास्तरांक आणि आबा नाबराक, लागलाहा खूळ! समाजशेवा करतहत! डोंबलाची समाजसेवा!" इतक्या उपेक्षेनंतरही खांडेकर शाळेत शिकवित राहिले. प्रयत्न करीत राहिले.
 वि. स. खांडेकर शिरोड्याला शिक्षक म्हणून आले ते स्वतःचे सुखदुःख विसरून; मनात, उराशी ध्येय बाळगून. पिढ्यानपिढ्या ज्यांच्या दाराशी शिक्षणाची गंगा कधीच गेली नव्हती, अशा मुलांना शिकवायच्या इराद्याने ते आले होते. गेली चार वर्षे (१९१६ ते १९२०) खेड्यातील लोकांसाठी काही करण्याचा ध्यास त्यांच्या मनाने घेतला होता. शिरोड्याने ती संधी दिली. महात्मा गांधींनी सन १९१८ साली निळीच्या मजुरांसाठी केलेला सत्याग्रहाचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडला होता. असे काहीतरी अद्भुत, नवे, सांस्कृतिक परिवर्तनाचे काम करण्याची त्यांच्या मनात ऊर्मी सुरसुरत होती. आगरकर, केशवसुतांचे निबंध नि काव्य अस्वस्थ करीत होते-

गत शतकांची पापे घोरे।
क्षाळायाला तुमची रुधिरे।
पाहिजेत रे, स्त्रैण न व्हा तर।

सारख्या केशवसुतांच्या कवितेच्या ओळी सामाजिक प्रायश्चित्त घेण्याची एक प्रकारे प्रेरणाच देत होत्या. यातून त्यांनी शिरोड्याला राहायचा बेत पक्का केला.
 पण व्यवहारतः हे सोपे नव्हते. वाचनाची भूक भागविणारी छोटी लायब्ररी गावात होती; पण वाचलेले कुणाशी बोलण्या-चर्चिण्याची सोय नव्हती. आक्काला घेऊन घर थाटले होते; पण तुटपुंज्या पगारात ओढाताण होत राहायची. वीस रुपये पगार हाती यायचा. तोही हप्त्याने मिळायचा. एखाद्या हप्त्यात तांबडे पैसेही घ्यावे लागत. कोकणाचं अठरा विश्वे दारिद्रय, माणसांचे पशुवत जिणे, जातीयता, अंधश्रद्धा, अज्ञान या सर्वांपुढे त्यांना आपले दुःख कसपटाप्रमाणे वाटायचे. पायपीट करून येणारी पंचक्रोशीतील उपाशी मुलं त्यांच्या डोळ्यांतील ज्ञानपिपासेपुढे ते सारी प्रतिकूलता मागे टाकून शिकवित राहत. शाळा मारुती मंदिर, निखारगे माडी, कोटणीस माडी अशी त्रिस्थळी भरायची. शिकविण्यात व्यत्यय नित्याचा; पण तरी त्यावर मात करून ते शिकवित राहत.

 अप्पा नाबरांनी शाळेला जागा देऊ केल्यानंतर इमारत उभारणीसाठी संस्था व शाळेच्या शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले.

वि. स. खांडेकर चरित्र/१११