पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याला संमिश्र प्रतिसाद लाभला. शाळेचे हितचिंतक मुंबईकर, माजी विद्यार्थी धनिक देणगीदारांचे पाठबळ लाभले. स्थानिकांपैकी काही व्यापारी मंडळींचा विरोध असे तो शाळा कुणाची? या प्रश्नावर. प्रसंगी धमक्या येत. ‘शाळा जाळू. समुद्रावर एकटे फिरायला जाता. मारू.' पण त्यापेक्षा सकारात्मक समर्थन मोठे होते. म्हणून इमारत उभी राहिली. याच काळात ‘गरीब विद्यार्थी फंड' उभारला गेला. पुढे ‘माजी विद्यार्थी मंडळ' अस्तित्वात आले. व्याख्यानमाला सुरू झाली. सहभोजनाचे कार्यक्रम झाले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, न. चिं. केळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी बा. भ. बोरकर, आचार्य प्र. के. अत्रे, मास्टर विनायक, अभिनेते बाबूराव पेंढारकर, मामा वरेरकर, कवी यशवंत अशी अनेक मंडळी शाळेस भेट देत गेली. शाळेची प्रसिद्धी महाराष्ट्रभर पसरली. शाळेस प्रतिष्ठा मिळाली ती सहली, काव्य संमेलने, पोहोण्याचे वर्ग अशा अनेक उपक्रमांतून, गावजत्रांतून शाळेला मदत मिळत गेली. भास्कर गोठोस्कर, व्ही. डी. दाभोळकर, डॉ. भि. अ. परब, चं. वि. बावडेकर, प्रा. वि. वि. दळवी, जयवंत दळवी, ब्रह्मानंद नाडकर्णी, प्राचार्य वा. श. नाबर, प्रभृती मान्यवर विद्यार्थी खांडेकरांच्या श्रमाचे फळ होय.
 शिरोड्यातील वास्तव्यातील चढउतारात खांडेकरांना तारले ते त्यांच्या साहित्यलेखनाने. 'नवयुग', 'महाराष्ट्र साहित्य'सारख्या मासिकांतून त्यांनी लिहिलं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा नि त्यांचा परिचय व्हायला ‘वैनतेय' साप्ताहिकाचे संपादन, लेखन कारणीभूत ठरले. न. चिं. केळकर त्यांना ‘गाढवाच्या गीता'मुळे ओळखू लागले; तर ‘घर कोणाचे?' कथेमुळे कोल्हटकर. 'आदर्श', 'कुमार' या टोपणनावाने त्यांनी 'होळी'सारख्या अनेक कविता रचल्या.भालेरावांच्या ‘अरविंद' मासिकातून ते समीक्षक झाले. कवी विनायकांवर लिहिलेला ‘गाण्यांचे गाणे' लेख अनेकांना भावला. ‘निबल द्या' लघुनिबंधाने खांडेकरांना लघुनिबंधक बनविले; तर 'छाया', ‘ज्वाला' चित्रपटांनी पटकथाकार. शिरोड्यात असतानाच वि. स. खांडेकर बडोदे, मडगाव येथे संपन्न साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. व्याख्याते म्हणून त्यांचा लौकिक मुंबई, पुण्यापर्यंत पोहोचला होता.

 शिक्षक म्हणून वि. स. खांडेकरांनी अभ्यासक्रमाबाहेर जाऊन शिकवत आपल्या विद्यार्थ्यांचा पिंड घडविला. गरीब, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांकडे ते आपुलकीने लक्ष देत. त्यांना नादारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत. काही गरीब विद्यार्थ्यांना तर ते आपल्या घरी ठेवून घेत असत. मुलांबरोबर मुलींना शिकता यावे म्हणून ते सर्व ते प्रयत्न करीत.

वि. स. खांडेकर चरित्र/११२