पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्यांच्या शाळेत जून, १९२० पासून पाचवीचा वर्ग सुरू होणार होता. त्यांना इंग्रजी व संस्कृत शिक्षकाची गरज होती. एप्रिलच्या प्रारंभी त्यांनी खांडेकरांना गाठले. एव्हाना खांडेकरांचे लेख, कविता विविध मासिकांतून प्रकाशित होऊ लागल्याने लेखक म्हणूनही लोक त्यांना ओळखू लागले होते.
 वि. स. खांडेकरांनी शिरोडा हे खेडे आहे, याची खात्री करून घेतली. ते १२ एप्रिल, १९२० रोजी सावंतवाडीहून चालत शिरोड्याला आले. त्यांच्यासोबत त्यांचे उपाध्याय अनंत ढोरे होते. हातात एक पिशवी होती. पिशवीत दोन पुस्तके होती. पैकी एक होते ‘केशवसुतांची कविता'. शिरोड्याच्या एकटेपणात या पुस्तकाने साथ दिली व सामर्थ्यही. पावणेसहा फूटांची उंच, कृश देहयष्टी, शर्ट, कोट, धोतर, टोपी असा स्वदेशी पेहराव. डोळ्यांवर चांदीच्या काडीचा जाड भिंगांचा चष्मा. पायी चप्पल. हातात छत्री. अशा अवतारात शिरोड्यात आलेल्या खांडेकर मास्तरांना पाहण्यात लोकांना मोठं औत्सुक्य होतं. ‘ह्योरे काय शिकयतलो पोरांक?' असा प्रश्न सर्वांच्या चेह-यावर होता.
 दुस-या दिवसापासून प्रत्यक्ष शिकविण्याचे काम सुरू झाले. तत्पूर्वी पंधरा दिवसांसाठी खांडेकर मास्तरांची राहायची सोय शाळेने नाबरवाड्यातील बापू खांडेकरांच्या घरी केली होती. मे महिन्याच्या सुट्टीपूर्वी शाळा अजून पंधरा दिवस चालणार होती. दुसरीचे इंग्रजी व चौथीचे संस्कृत, कुणाचं मराठी तर कुणाचे गणित असं पडेल ते खांडेकर मास्तर शिकवित राहिले. या काळात त्यांची ओळख शिवारी मास्तर, अप्पा नाबर, डॉ. राजाध्यक्ष, प्रभृतींशी झाली. शाळा सुटल्यावर खांडेकर सहकाऱ्यांसह शिरोडा, आरवली, रेड्डीचा परिसर पाहून इथलं वातावरण, लोक, निसर्ग व प्रश्न समजावून घेत होते.

 शिरोड्याचा परिसर रमणीय होता. शाळेच्या विद्यार्थ्यात नाबर, नाडकर्णी, बावडेकर, कालेलकर यांच्या बरोबरीने गावडे, परब, तांडेल, नाईक, आरोंदेकर नावे भेटत. शाळेत सर्व जातिंची मुले पाहून खांडेकर सुखावले. हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागले की, आपले विद्यार्थी पाडपी, भारेवाले, गाबतिणी, शेतकरी यांचे अधिक आहेत. ती त्यांच्या घरातली शिकणारी अशी पहिली मुले होती. समाजाच्या या शिलावस्थेचे चित्र पाहून खांडेकरांमधील शिक्षक व लेखक एकाच वेळी प्रेरणा, संवेदना, ध्येयाच्या हिंदोळ्यावर झोके घेत राहायचा.

वि. स. खांडेकर चरित्र/११०