पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(आ) वि. स. खांडेकर : एक तपस्वी शिक्षक


 सन १९१६ ते १९२० हा ऐन तारुण्याचा काळ वि. स. खांडेकरांच्या जीवनातील विलक्षण संघर्षाचा आणि वैचारिक घालमेलीचा होता. सन १९१३ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांंत ते बारावे आले होते. त्या वेळचा महाराष्ट्र म्हणजे गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र मिळून विशाल महाराष्ट्र होता, हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. मॅट्रिक होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात जानेवारी, १९१४ मध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण देण्याची घरची स्थिती नसल्याने त्यांना त्यांचे नाणेली (सावंतवाडी)तील काका सखारामपत खांडेकरांना दत्तक देण्यात आले. त्यांची सावकारी होती. मोठा जमीनजुमला होता; पण झाले उलटे. त्यांना मूलबाळ नसल्याने सावकारी व शेती पाहायला वारस हवा होता. वि. स. खांडेकरांना तर शिकायचे होते. पुण्याच्या मुक्कामात वाचन विस्तृत झालेले. नाटककार राम गणेश गडकरींचा सहवास लाभल्याने साहित्य, संगीत, काव्य, मनोरंजन, राजकीय, राष्ट्रीय परिस्थिती याविषयीचे त्यांचे आकलन विस्तारलेले होते. टिळक, आगरकर, महात्मा गांधी यांच्या विचार व ध्येयाचा विलक्षण परिणाम त्यांच्यावर झालेला होता.

 शिक्षण मिळणार नसेल तर स्वावलंबी होऊन स्वतंत्र जीवन जगावे या विचाराने ते पुण्याहून सावंतवाडीस परतले. इथे मेघश्याम शिरोडकरांसारखा तरुण, ध्येयवादी समविचारी तरुण भेटला. ग्रंथालय चालविणे, व्याख्याने योजणे, मित्रांना वाचलेले समजावून सांगणे या धडपडीतून त्यांच्या बुद्धिमत्तेचा गवगवा परिसरात झालेला. ते उपचारासाठी म्हणून बांबुळी मुक्कामी असताना त्यांची महती घनश्याम आजगावकर यांच्या कानी पडली. ते शिरोड्याच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते.

वि. स. खांडेकर चरित्र/१०९