पान:विश्व वनवासींचे.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बीडकर द.न. उपाख्य दादासाहेब

 जन्म : दि. १९ मार्च १९१०, जन्मस्थळ : कोल्हापूर

 मृत्यू : दि. १२ मार्च २००५ स्थळ - नाशिक.

 दादासाहेब बीडकर यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरला आजोळी व महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद येथे झाले. १९३० च्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागानंतर दादासाहेबांनी नाशिक, मनमाड, बागलाण येथे ग्रामसेवा समिती माध्यमातून काम चालू केले. त्यावर इंग्रजांनी बंदी घातली. दादांना १ वर्षे कारावास झाला. १९३४ मध्ये जेलमधून सुटल्यावर बिहार येथे ६ महिने राहून भूकंपग्रस्तांची त्यांनी ६ महिने सेवा केली. स्वातंत्र्य लढे, त्यासाठी तुरुंगवास शिक्षण आणि समाजातल्या वनवासी घटकांचे उत्थान घडविणे, कार्यकर्ते निर्माण करणे, लोकसंग्रह वाढविणे यात त्यांचे आयुष्य खर्ची पडले. केवळ समाससेवेसाठी आणि वनवासींच्या विकासासाठी त्यांची 'डांग सेवा मंडळ' ही संस्था आजतागायत कार्यरत राहिली आहे. नाशिक जिल्ह्यात त्यांनी केलेली वनवासींची सेवा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लक्षवेधी आहे. वनवासी बांधवांच्या विकासासाठी त्यांनी डोंगरदऱ्या खेडोपाडी हिंडून त्यांच्या जागृतीचे कार्य केले. जंगलतोडीत राबणाऱ्या वनवासींचे शोषण थांबवावे म्हणून त्यांनी जंगल कामगार सोसायटी निर्माण केली. आयुष्यभर वनवासी सुधारणेचा ध्यास घेऊन त्यांच्या सेवेचा स्त्रोत प्रवाही ठेवला होता. कलानृत्याच्या आवडीतून त्यांनी कलापथके उद्बोधनासाठी तयार करून गाजविली. अतिदुर्गम भागात आश्रमशाळा, वसतिगृहे, शिक्षणसंस्था काढल्या. पेठ, अभोणा येथे त्यांनी महाविद्यालयांची स्थापना केली. त्यांनी आमदारपदही भूषविले. पण ज्ञानगंगा घरोघर पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य केले. म्हणूनच त्यांना वनवासी सेवक, थोर स्वातंत्र्य सैनिक, दलितमित्र, कर्मवीर, तपस्वी, नाशिकभूषण या समाजाने बहाल केलेल्या पदकांबरोबरच पुणे विद्यापीठाने मानाची 'जीवन गौरव' उपाधीही बहाल केली आहे.

***

९६
विश्व वनवासींचे