पान:विश्व वनवासींचे.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचे मन खऱ्या अर्थाने रमले ते समाज शिक्षणातच. लोकशिक्षणासाठी लोकसाहित्याचे संशोधन, संकलन, समीक्षण, पुनर्मूल्यांकन होणे त्यांना खूप गरजेचे व रूचीचे वाटले म्हणून उभी हयात त्यांनी लोकसाहित्यासाठीच वेचली. महाराष्ट्रात सर्वत्र प्रवास करून लोकसाहित्याबरोबरच लोकसाहित्याचे अभ्यासकही गोळा केले. दुर्गा भागवत, इरावती कर्वे, डॉ. ना.गो. नांदपूरकर, वि.का. राजवाडे, साने गुरुजी यांची पूर्वीची परंपरा पुढे चालविली. हा अनमोल वारसा जपायला शिकविला. त्याचे महत्त्व जाणकारांच्या लक्षात आणून दिले. याचा सुपरिणाम म्हणजे आता सर्वच विद्यापीठात स्वतंत्रपणे लोकसाहित्याचा अभ्यास एम.ए., एम.फिल., पीएच.डी. पदव्यांसाठी आवर्जून होत आहे.

 स्त्रीयांच्या ओव्या, लावण्या, गाणी, म्हणी, वाक्प्रचार, बोली, पुरुषांचे लोकजीवन, संस्कृती, विद्या सारेच जतन केले जाऊ लागले. त्यात पर्यावरण आहे. ते लोकसाहित्यात सामावलेले आहे. वरवर गावठी म्हणी - अंध समजुती वाटतात पण त्यात विज्ञान असते. धार्मिक पूर्वपरंपरा असतात. श्रद्धा आणि मानस असते. कवी हृदयाच्या, रासक आणि आस्वादक भूमिकेतून त्यांनी वनवासी, ग्रामीण लोकसाहित्याचे प्रसंगोपात्त महत्त्व मांडले आहे.

एक ऋणानुबंध

 योगायोगाने मला पुण्याच्या बालचित्रवाणीचे निमंत्रण होते. माझ्या कल्पनेतही नव्हते. नैतिकमूल्यांची शिक्षणात आवश्यकता या विषयावर भूमिका मांडायची होती आणि माझ्या समवेत होत्या डॉ. सरोजिनी बाबर आणि डॉ. रा.शं. वाळिंबे. या दिग्गजांबरोबर एका चचेचं चित्रण केले गेले. त्याही वेळी सरोजिनी आक्का म्हणाल्या, 'मला मेकअपची गरज नाही.' अशा त्या नैसर्गिक, सहज सुंदर जीवनात रमलेल्या होत्या. मी जव्हारला होतो तेव्हा त्यांच्या लोकसाहित्य विषयक पुस्तकात लिहायची संधी मिळाली. मला आठवते, त्यांनी संपादित केलेल्या दसरा-दिवाळीमध्ये मी जव्हारच्या दसऱ्यावर लिहिले. 'नादब्रह्म'मध्ये वनवासींच्या कलाविष्कारावर व ग्रामदैवतावर लिहिले. त्यांच्या कार्यालयात आणि घरीही त्यांना भेटण्याचा योग आला. हा ऋणानुबंध आज आठवतो.

***

सरोजिनी बाबर

९५