पान:विश्व वनवासींचे.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. डॉ. बाबर यांचा जन्म ५ जानेवारी १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वांगणी येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि शालेय शिक्षण इस्लामपूर, सातारा आणि नगर येथे झाले. मुंबई विद्यापीठातून बी.ए., एम.ए. पदव्या त्यांनी उत्तम गुणवत्तेसह संपादन केल्या. ग्रामीण भागातील एक मराठमोळी मुलगी आश्चर्यकारकरित्या उच्च शिक्षण घेतच राहिली. पुढे त्यांनी पीएच.डी. पदवीसाठी संशोधन पूर्ण केले. त्यांचे वडील श्री. कृष्णराव बाबर हे पुरोगामी विचाराचे असल्याने त्यांनी उच्चशिक्षण तर घेतलेच, पण समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेऊन पिताजींचा वारसा सातत्याने पुढे चालविला.

 कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेत त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले. मराठी विषयातल्या नरसिंह चिंतामण केळकर पारितोषिकाच्या त्या मानकरी ठरल्या. पुढे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने १९९४मध्ये व पुणे विद्यापीठाने १९९७ साली त्यांना डी. लीट. ही सन्मानाची पदवी दिली.

विविध गौरव पुरस्कारांच्या मानकरी

 त्यांच्या कार्याचा उचित गौरव म्हणून त्यांना पुणे विद्यापीठाने ‘जीवन गौरव पुरस्कार' प्रदान केला. यापूर्वी राहुरी कृषि विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट ऑफ सायन्स, भारती विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार, कोल्हापूर येथील भद्रकाली ताराराणी पुरस्कार, पुणे महापालिकेचा पट्ठे बापूराव पुरस्कार, मराठा सेवा संघातील विश्वभूषण पुरस्कार, राज्य साहित्यसंस्कृती मंडळाची गौरवकृती, राज्य लोकसाहित्य मंडळाचे अध्यक्षपद इत्यादी .

लोकप्रतिनिधी

 स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनाच्या काळात त्या सहभागी झाल्या. वाट्याला आलेला तुरुंगवासही त्यांनी भोगला. १९५२ ते १९५७ या काळातील मुंबई प्रांताच्या विधानसभा सदस्या, १९६४ ते १९६६ या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या आणि १९६८ ते ७४ या काळात त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी लोकाभिमुखवृत्तीनेच सर्व कार्य केले.

सहृदय समीक्षक

 राजकारणापेक्षा समाजकारणात त्यांना खरे स्वारस्य होते म्हणून

९४
विश्व वनवासींचे