पान:विश्व वनवासींचे.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वनवासी लोकसाहित्याची जपणूक करणाऱ्या आक्का म्हणजे सरोजिनी बाबर


 डॉ. सरोजिनी बाबर यांचे कौटुंबिक नाव जरी आक्का असले तरी सर्वार्थाने लोकसाहित्याच्या व्यासंगी किंबहुना सर्वच अभ्यासकांच्या संदर्भातही त्या आक्काच होत्या. आक्का म्हणजे मोठी बहीण. तिचा मान आणि अधिकारसुद्धा मोठाच असतो. असाच लोकसाहित्य संशोधन, संकलन, परिशीलन कार्यात डॉ. सरोजिनी बाबर यांचा मान आणि अधिकार मोठा आहे. अधिकाराच्यादृष्टीने लोकसाहित्य संदर्भात हा ज्येष्ठत्वाचा सन्मान डॉ. सरोजिनी बाबरांचा आहे.

अस्सल देशी वाण

 डॉ. सरोजिनी बाबर म्हणजे गेल्या पिढीतील अस्सल देशी वाण म्हणावे लागेल. त्यांच्या अंतर्बाह्य स्वरूपावरूनही याची कल्पना येऊ शकते. एखाद्या ग्रामीण महिलेसारखी ही विदुषी, पीएच.डी./ डी.लीट् असून वावरली. हे महाराष्ट्राच्या मराठी बाण्याला भूषणावह वाटावे असेच आहे. कपाळी ठसठशीत कुंकू, डोक्यावरून पदर, सदा हसतमुख चेहरा, बोलताना भरभरून आनंद ओसंडविणारे संभाषण सारेच देखणे. आज ते सारे ‘रानजाई' या दूरदर्शनच्या प्रेक्षकांनाही आठवत असेल.

विपुल लेखन - संपादन

 डॉ. सरोजिनी बाबर यांनी विपुल लेखनाबरोबरच संपादनेच अधिक प्रमाणात केलेली आहेत, त्यात कमालीचे वैविध्य आहे. समाज शिक्षणाची तळमळ त्यात आहे. किंबहुना समाजशिक्षण मालाच त्यांनी विस्ताराने गुंफली आहे. स्वत: विपुल लेखन त्यांनी केले पण त्याबरोबरच भेटणाऱ्या प्रत्येक लेखकालाही त्यांनी लिहिते केले. लेखनाचे विषय दिले आणि प्रेरणाही दिली. लेखन करून घेण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावाही केला. थोडेथोडके नव्हे तर सुमारे चार तपे किंबहुना अर्धे शतक त्यांनी लोकसंस्कृतीचे चिंतन मनन केले, त्यातून हे साहित्य जन्मलेले आहे.

९२
विश्व वनवासींचे