पान:विश्व वनवासींचे.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवासी : नैतिक, सौदर्यशास्त्रीय

 आणि सामाजिक परिमाणे

 परिमाणे याचा अर्थ निकष किंवा मोजमाप. वनवासींची नैतिक परिमाणे म्हणजे त्यांच्या नीतिविषयक कल्पना. ते करीत असलेली, नीतिमूल्यांची जपवणूक त्यांच्या जीवनातील नैतिकतेचा विचार होय. याच पद्धतीने वनवासींच्या सौंदर्यविषयक संकल्पना, त्यांच्या सौंदर्यशास्त्रीय जाणिवा, कलादृष्टी आणि त्यांचे एकूण कलाविश्व त्याचा परामर्श येथे घ्यावयाचा आहे. सामाजिक परिमाणांमध्ये,वनवासींची समाजमनस्कता, समाजातील जागरूकता आणि सामाजिक जीवनाची विविध वैशिष्ट्ये येथे लक्षात घ्यावयाची आहेत.

 तेव्हा नैतिकतेचे वनवासींचे निकष कोणते? आणि त्याचा प्रत्यय त्यांच्या दैनंदिन जीवनातून कसा येतो, याचा विचार प्रारंभी करता येईल.

 वनवासी भागात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या एका पांढरपेशा कार्यकर्तीला प्रश्न विचारला जातो, तुला हे काम करणे कसे शक्य होते? त्यावर तिचे उत्तर आहे. एक वेळ, पुण्यामध्ये रात्री एकटे रिक्षातून जायला आम्ही घाबरतो. पण वनवासी पाड्यावर आम्हाला रात्रीसुद्धा यायची वेळ आली, तर कधीच भीती वाटत नाही. मला वाटते या उत्तरातच वनवासींच्या जीवनमानातील नैतिकतेचे स्थान स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ एकट्या, शहरी महिलेला या वनवासी पाड्यांमध्ये निर्भयपणाने वावरता येते, ते रात्रीच्या वेळीही ! याची ग्वाही एका कार्यकर्ती महिलेने आवर्जून येथे दिलेली आहे. हे स्त्रीदाक्षिण्याचे अव्यक्त, स्त्रियांबद्दलच्या, सुप्त आदराचे प्रतीक- उदाहरण आहे.

 वनवासींमध्ये मातृसत्ताक पद्धतीला (मेट्रिआर्कल सिस्टीमला) अद्यापही वाव आहे. म्हणूनच वनवासींमध्ये विवाह ठरताना मुलीच्या पित्याला 'दहेज', धान्य, जमेल त्या धान्यांच्या स्वरूपात, निदान