पान:विश्व वनवासींचे.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाताची २ पोती तरी देण्याची प्रथा रूढ आहे. त्यासाठी मुलाला, मुलाच्या पित्याला, लग्नाआधीच जमवाजमव, तरतूद करून ठेवावी लागते. कधी कधी तेवढ्यासाठी हे लग्न खोळंबूनही राहते. जेव्हा ही जुळवाजुळव, आर्थिक तरतूद होते, तेव्हा लग्नसोहळा साजरा होतो. समजा हे शक्य झाले नाही, तर 'घरजावई' 'घरोंदा' पद्धती रूढ आहेच. त्यात मुलीच्या घरी ठरलेला कालावधी, मग २/३ वर्षे मुलाने राहायचे, त्याच्या शेतीत राबायचे, कष्ट उपसायचे आणि आगळ्या त-हेने ही परतफेड करायची. यातला आशय हा की 'स्त्री'ला कुटुंबात प्रमुख महत्त्वाचे स्थान आहे. समजा, त्या मुलाचा ठराविक कालावधी पूर्ण झाला तर तू आणखी राहशील का मुलीच्या बापाकडे? असे विचारल्यावर तोही स्वाभिमानाने सांगतो, मी एक दिवसही जास्तीचा राहणार नाही. लगेच मुलीला घेऊन घरी येईन. काही कारणाने हेही शक्य झाले नाही तर पुन्हा दोघेही परस्पर सम्मतीने विवाहापूर्वी, निष्ठेने एकत्र राहतात. प्रसंगी अपत्येही जन्माला घालतात आणि नंतर विवाहविधी, आर्थिक स्थिती बरी झाल्यावर पार पाडतात.

 वनवासींमध्ये मुलीला कधीही सासुरवास, छळ हा प्रकार ऐकिवात नाही. फार तर न पटले तर 'तुझ्या आईकडे जाऊन तू खुशाल राहा.' हा मार्ग येथे आहे. पटलेच नाही आणि एकमेकांचा विश्वास गमावला, दुसरीकडे लक्ष गेलेच तर जातपंचायत बसवून सरळ शब्दश: 'काडीमोड'मार्ग दोघांनाही खुला असतो.

 एका वनवासी कार्यकर्त्याला लग्नासाठी पैसे हवे असतात. त्याने ते स्वयंसेवी संस्था चालकांकडे मागितलेलेही असतात. पण त्याला पैसे द्यायचे, या ना त्या कारणाने राहून जाते. जेव्हा पुन्हा आठवण होते तेव्हा तो कार्यकर्ता म्हणतो, 'जर मला लवकर पैसे दिले तर बरे होईल.' याचे कारण तो सांगतो...सांगताना लाजतो... 'आता फक्त चार महिने उरले आहेत. थोडी घाई केली पाहिजे.' इतक्या नि:संकोचपणे ते एकत्र राहू शकतात. वनवासी तरुण तृप्त असतात. ते वखवखलेले नसतात. त्यामुळे नीतिमूल्यांची चाड, स्वाभाविकपणेच राखली जाते. वनवासींमध्ये 'ओढ्या' या नावाची एक कल्पनाही आढळली. पुनर्विवाह करताना, स्त्री जर पूर्वीच्या पतीपासून गरोदर

विश्व वनवासींचे