पान:विश्व वनवासींचे.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाळासाहेब देशपांडे यांनी वनवासींचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, श्रद्धा जागरण, हितरक्षा, सुसंस्कार यांसारख्या विषयात काम करून परिवर्तन घडवून आणले आहे. याची प्रचिती आज वसतिगृहे, शिक्षणसंस्था, खेलकूद, आश्रमशाळा, फिरते दवाखाने, आरोग्य रक्षक, बालसंस्कार केंद्र, भजनी मंडळे यामधून येते.

 या विविध क्षेत्रात उभ्या राहिलेल्या अनेकानेक सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून वनवासींची एक जबरदस्त संघटना, एक प्रबळ शक्ती निर्माण झाली आहे. भारतीयत्वाचे संस्कार देण्यासाठी भारताच्या गौरवशाली परंपरेचे पाईक म्हणून आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्यासाठी या वनवासी कल्याण आश्रम संस्थेचे कार्य गेली ६५ वर्षे चालू आहे. त्याचे सारे श्रेय निर्विवाद बाळासाहेब देशपांडे यांचेच आहे. त्यांनी इ.स. १९७९ पासून महाराष्ट्रात वनवासींचे कार्य सुरू केले. आपल्या महाराष्ट्र प्रांताचा विचार केला तर गेल्या ३० वर्षांत वनवासींची सशक्त, सुसंघटीत, कर्तबगार नवी पिढी निर्माण झाली आहे हे लक्षात येते.

महाराष्ट्र प्रांत स्थिती : २००९

 बाळासाहेबांनी देशभर वनवासी विकासाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यात त्यांना अनेक सहकारी लाभले. आपण नुसत्या महाराष्ट्र प्रांताच्या सद्य:स्थितीचा विचार केला तरी याची कल्पना येऊ शकेल. महाराष्ट्रात एकूण १६०२ प्रकल्प आहेत. त्यात महाराष्ट्रात शैक्षणिक प्रकल्प जे चालू आहेत त्यात वसतिगृहे १९, प्राथमिक शाळा ०२, माध्यमिक शाळा ०२, बालसंस्कार केंद्रे १२, लाभार्थी १६०० तर आरोग्य प्रकल्पात साप्ताहिक आरोग्यकेंद्रे ४, दैनिक केंद्रे १, आरोग्यरक्षक ५७६, लाभार्थी ४ लाख तर इतर प्रकल्पांमध्ये खेलकूद केंद्रे १५, श्रद्धा जागरण केंद्रे एकूण प्रकल्प १,१२३ पूर्ण वेळ कार्यकर्ते ८१ पुरुष, ६५ महिला, ग्रामसमिती २१८ आणि महिला समिती ६५ इत्यादी अशी ही एका प्रांताची स्थिती. असेच काम चालू आहे. वनवासींची प्रगती झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने भारत देश हा महासत्ता होणार नाही, हे बाळासाहेबांनी हेरले होते. म्हणून त्यांनी वनवासी सर्वांगीण विकासाचे स्वप्न खरे करून दाखविले. 'इवलेसे रोप लावियले द्वारी । तयाचा वेलु गेला गगनावरी ।' अशी त्यांच्या वनवासी कल्याण

७८
विश्व वनवासींचे