पान:विश्व वनवासींचे.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मा. बाळासाहेब देशपांडे जन्मशताब्दी स्मरण

 वनवासी समाजाचे अग्रेसर सुधारक म्हणून आज कै. बाळासाहेब देशपांडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. वनवासी कल्याण आश्रम या आज देशभर कार्यरत असलेल्या संस्थेची स्थापना मा. कै. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींच्या प्रेरणेने झाली. आज या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याने आपल्या कर्तव्यनिष्ठ कार्याची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. ही वनवासींच्या हितरक्षणासाठी स्थापन केलेल्या संस्थेच्या दृष्टीने गौरवाची आणि समाधानाची बाब आहे. स्थापनेपासूनच्या आणि तत्पूर्वीही केलेल्या महान खडतर अशा बाळासाहेब देशपांडे यांच्या साधनेला, तपस्येला हे श्रेय निर्विवादपणे द्यावे लागते. स्वत: ठक्करबाप्पा आणि गुरुजींनी त्यांना मार्गदर्शन केले, आशीर्वाद दिले. कार्याची व्याप्ती वाढल्यावर पुन्हा एकदा ठक्करबाप्पा स्वत:हून बाळासाहेबानी वनवासींच्या मूलभूत गरजा पूर्तीचे आणि विकासाचे केलेले कार्य पाहायला आले होते. बाळासाहेब देशपांडे वकील होते. त्यांना त्या काळात उत्तम वकिली करता आली असती. पण वकिली बाजूला ठेवून वनवासी बांधवांचा अंत:करणापासून त्यांना कळवळा आला आणि मोठ्या तळमळीने या 'कंटकाकीर्ण' मार्गाने आपले आयुष्य वेचण्याचा त्यांनी निर्धार केला.

वनवासी कल्याण आश्रम

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक महत्त्वपूर्ण आयाम म्हणून वनवासी बंधू-भगिनींच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी सिद्ध झालेली ही संस्था म्हणजे स्व. बाळासाहेब देशपांडे यांचे नवनिर्माण कार्य आहे. बाळासाहेब देशपांडे यांनी दि. २६ डिसेंबर, १९५२ मध्ये या संस्थेची स्थापना केली. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे सर्वच सेवाकार्य श्रेष्ठच आहेत, पण अत्यंत व्यापक आणि विशाल दृष्टिकोन स्वीकारून

७७