पान:विश्व वनवासींचे.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
समाज विकासक

 गोल वर्तुळात उभे राहून एक खेळ खेळला जातो. बर्फाचा खडा पहिल्या व्यक्तीच्या हातावर दिला जातो. वर्तुळ पूर्ण होताना १०/ २० माणसांच्या हातावर तो क्रमाने दिला जातो. शेवटच्या माणसाच्या हातात नुसते बर्फाचे पाणी शिल्लक राहते. अशी स्थिती वनवासी समाजाच्या विकासाबाबत घडली असे म्हणायला वाव आहे, कारण अगदी आजही या वनवासी बांधवांची स्थिती शोचनीय आहे. २० वे शतक संपले २१सावे लागले. पण स्थिती २०व्या शतकातली जाणवते. स्वातंत्र्याचा आता सुवर्ण महोत्सव संपून हीरक महोत्सवही झाला आहे. पण वनवासींच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजन या मूलभूत गरजा सर्वार्थाने पूर्ण झाल्या असे म्हणता येत नाही. पाड्या पाड्यात विखुरलेल्या वनवासींच्या वस्तीला भेट दिली म्हणजे याची प्रचीती येते.

महाराष्ट्रातील वनवासी भाग

 महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात डहाणू, पालघर, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हा भाग संपूर्णपणे वनवासी आहे. त्यांच्या उत्थानावर अधिक लक्ष पुरविता यावे म्हणूनच ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी पुढे आली होती. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, बागलगण-सटाणा, देवळा, इगतपुरी, हरसूल हा भाग वनवासींचा आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव परिसर, नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसर, नागपूर विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हे जिल्हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, नगर जिल्ह्यातील अकोले, शिर्डी, राजूर, लिंगदेव, भंडारदरा हा भाग अद्यापही वनवासींचे जीवनमान लक्षात आणून देणारा आहे. कुपोषण, बालमृत्यू, अनारोग्याची समस्या वनवासी पाड्यामध्ये भीषण स्वरूपात आहे.

७३