पान:विश्व वनवासींचे.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गिरिजन, भूमिजन, भूमिवासी, आरण्यक इत्यादी नावांनी संबोधिले जाते. जनजाती हा शब्द उत्तरेत रुढ आहे. 'aboriginal' या इंग्रजी शब्दाचा कडक निषेध ते करतात. कारण 'आपल्या स्थानी मूळचा नाही' असा त्याचा अर्थ आहे. मुळापासून म्हणजे नेमके काय? पृथ्वीची उत्पत्ती की 'मानव' साकारला तेव्हापासून असे हे अनिर्णितच राहते. आदिवासी शब्द कालवाचक आहे. तो जमाती दर्शक नाही. त्यातून दुरावा, वेगळिक आणि अलिप्तपणाच वाढविला जाण्याची शक्यता आहे. शिवाय अकारण आदिवासी या शब्दाला मागासलेपणा चिकटलेला आहे.

 संघ परिवाराने वनात वास्तव्य असल्याने 'वनवासी' ही संज्ञा शोधली. अनेक प्रकारांनी विचार केला तर हा प्रयोग उचित वाटतो. मात्र त्याचाही नीट अर्थ आपण लावला पाहिजे. आदिवासी शब्दाने त्याचा ‘आर्यपूर्व भारतीय लोक' वगैरे चुकीचा अर्थ लावला जातो तो दुजाभाव वाढविणारा आहे. म्हणून सर्वत्र 'वनवासी' शब्द वापरून अधिक जवळीक साधता येईल व वनवास संपवून मुख्य प्रवाहात सामीलही करून घेता येईल. कोणत्याही प्रकारे या वनवासी शब्दाचा रामाच्या अथवा पांडवांच्या वनवासाशी संबंध दूरान्वयानेही नाही.

***

७२
विश्व वनवासींचे