पान:विश्व वनवासींचे.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामूहिकरित्या होत आहे. त्यामुळे अनेकदा ज्ञात असलेला इतिहास . पुसण्याचा प्रयत्न होतो. सत्य दडविले जाते आणि चुकीच्या, अनैतिहासिक, अयोग्य दिशेने वनवासींबद्दल हेतु पुरस्सर गैरसमज पसरविणारे लेखन केले जाते. विचार प्रस्तृत केले जातात. यासाठी सावधानता बाळगून या प्रतिपादनांचा सखोल अभ्यास करून मगच निष्कर्षाप्रत आले पाहिजे, अन्यथा अज्ञानी व गरीबीत होरपळणाऱ्या, दुर्गम पाड्यात (Remote Villages) अति ग्रामीण भागात राहणाऱ्या वनवासींना खरा न्याय कधीच मिळू शकणार नाही. जेव्हा वनवासी स्वत: उच्च शिक्षित होऊन स्वत:चा इतिहास प्रामाणिकपणे शोधू लागेल तेव्हाच स्वार्थ प्रणित इतिहास गळून पडतील. वनात तयार झालेली त्याची परिभाषा, संकल्पना त्यालाच समजावून सांगण्याची वेळ येईल.

वनवासींच्या ऐतिहासिक वाटचालीतील पाऊल खुणा

 वनवासी स्वत:च्या वाटा (Shortcuts) खेड्यापाड्यात स्वत:च निर्माण करून जवळच्या रस्त्याने शहरात मुख्य प्रवाहात कसाबसा पोहोचतो. डोंगर दऱ्या आणि चढ उतारातील त्याच्या या खडबडीत बळे बळे रुळविलेल्या वाटा असतात. तसेच काहीसे त्याच्या इतिहासाबद्दलही चित्र दिसते. काहीसा धूसर, पुरेसा न उलगडणारा त्याचा इतिहास सकृत दर्शनी वाटतो. तेव्हा तरीही प्रयत्नपूर्वक आपण या वनवासींच्या जीवनाचा परंपरेने चालत आलेल्या वाटेने जाऊन इतिहासाच्या काही ठळक पाऊलखुणा शोधू शकतो. स्पष्टपणे उमटलेल्या या पाऊलखुणांचा मागोवा घेऊ शकतो. तोच वनवासींचा खरा इतिहास, त्यांच्याच जीवनशैलीच्या आधाराने आपल्याला शोधणे शक्य होईल.

  लोकसंस्कृती वनवासींची

 वनवासींच्या लोकसंस्कृतीतच त्यांच्या इतिहासाची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. वनवासींची अगदी आजची वनातल्या पाड्यावरची संस्कृती आपण न्याहाळली तर आपल्याला भारतीयत्व (Indianisation) एकात्मता (Integrity), समरसता (Oneness), अतिथ्यशीलता (Hospitality), माणुसकीचा (Humanism) प्रत्यय येतो. नि:संशय

विश्व वनवासींचे
७०