पान:विश्व वनवासींचे.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवासीच्या पाऊलखुणा

 वनवासींच्या इतिहासाचा अभ्यास कोणत्याही मानव समाजाच्या, जातीच्या, भाषा, बोलभाषांच्या इतिहासाइतकाच जटिल (Complicated) गुंतागुंतीचा असतो. भरपूर वर्षे आणि काळ उलटल्यानंतर तर्क-वितर्क करणे, अर्थाचे अनर्थ आपल्या स्वत:च्या सोयीनुसार करणे हे घडू शकते. 'वनवासी' राजकारणाच्या कचाट्यातही सापडला आहे. सोयीस्कररित्या राजकारण्यांनी वनवासींना आपल्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न चालविलेला असतो. त्याला आपल्या जाळ्यात ओढून आपली पोळी कशी भाजता येईल याचा विचार तो करीत असतो. या सगळ्याचा परिपाक आणि परिणाम म्हणजे आज वनवासींच्या खऱ्याखुऱ्या इतिहासाला अनेक फाटे फुटलेले आहेत. त्याची विविध परिमाणे तयार झाली आहेत. त्यातून नवी समीकरणे मुद्दामच निर्माण करण्यात आली आहेत.

मानववंश शास्त्रीय अभ्यासाची गरज

 वस्तुत: वनवासींच्या कुळाचा आणि मुळाचा शोध घ्यायचा असेल तर आपण मानववंशशास्त्राचा (Anthropology) आधार घेतला पाहिजे. मौखिक परंपरेने चालत आलेल्या वनवासींच्या लोक वाङ्मयाचा, लोक साहित्याचा (Folklore) अभ्यास केला पाहिजे. केवळ कर्णोपकर्णी आणि तोंडी (Oral Transmission) मौखिक परंपरेने चालत आलेल्या लोकगीतामधून वनवासींची आगळी संस्कृती जीवनशैली आपण समजून घेऊ शकतो. वनवासी संस्कृतीची खरी पाळेमुळे या मौखिक साहित्यात दडलेली आपण उलगडून घेतली पाहिजेत. तरच आपल्याला योग्य तो बोध होऊ शकतो.

अज्ञानाचा-दारिद्र्याचा लाभ

 वनवासी अडाणी आणि कमालीचा दरिद्री राहिल्याने त्याचा स्वार्थी भावनेने लाभ उठविण्याचा प्रयत्न व्यक्तिगत पातळीवरून आणि

६९