पान:विश्व वनवासींचे.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या होळीच्या जत्रेत सहभागी होतात.

 “फाग म्हणजे देणगीची प्रथा", होळीच्या सणासाठी फाग - म्हणजे देणगी हे वनवासी दारोदार हिंडून मागतात. त्याच देणगीतून होळीचा सण साजरा होतो. अशा या होळीच्या सणाशी निगडीत एक लोककथा आहे.

होळीची वनवासी लोककथा

 पोरब राजाची मुलगी होळी या नावाची होती. ती एका भोंगडा नावाच्या युवकाच्या प्रेमात पडते. त्याचे कारण या भोंगडाजवळ बांबूपासून विविध कलात्मक वस्तू तयार करण्याचे कसब असते. त्याच्या या कलाकौशल्यावर राजकन्या होळी पुरती भाळते. राजा पौरबाला तो राजा असल्याने हे पटत नाही. पण भोंगडावर - त्याच्या बांबूकलेवर नितांत प्रेम असल्यामुळे होळी अग्निकाष्ठ भक्षण करून त्यातून सही सलामत बाहेर पडून आपले दिव्य प्रेम सिद्ध करते. राजाला हा चमत्कार स्तिमित करतो आणि तो गरीब-श्रीमंती भेदभाव विसरून त्या दोघांचे लग्न लावून देतो.

 याच अपेक्षेने वनवासी तरूण-तरूणी होळी-भोंगड्या सारखा मनाजोगता जीवन सोबती मिळावा म्हणून होळीच्या सणाला जास्तीतजास्त संख्येने जमतात.

 यातच वनवासींच्या पर्यावरण रक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. पंचमहाभूतांपैकी 'अग्नी' या निसर्ग देवतेची होळीच्या माध्यमातून पूजा बांधली जाते आणि वातावरणाची शुद्धी होते, पावित्र्य वाढते. असा हा होळीचा सण वनवासी लोककला आणि लोकसंस्कृतीचे मनोज्ञ दर्शन घडविणारा, पर्यावरण राखणारा होतो.

***
६८
विश्व वनवासींचे