पान:विश्व वनवासींचे.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आढळते.

 मग ते होळीला प्रदक्षिणा घालतात. घरातले सगळे सान थोर फेऱ्या मारता-मारता मोठमोठ्याने बोंबा मारतात, आरोळ्या देतात. असा आनंदाचा एकच जल्लोष होतो, मात्र त्या जल्लोषात पोटभर नाचणाऱ्यांचे, गाण्याचे बोल कोणालाच उमगत नाहीत. अशा बोरगावच्या प्रातिनिधिक होळीमध्येसुद्धा मान-पान सांभाळून वनवासींच्या होळीच्या सणाचे मोठे अपरूप आहे.

खानदेशी होळी

 खानदेशातही वनवासी होळीची जय्यत तयारी करतात. महिला पारंपरिक वेषभूषा करून पारंपरिक दागदागिने घालून रिबिनी, रानफुले माळून नटून थटून बाहेर पडतात. वनवासींच्या या होळीसाठी सातपुड्याच्या भागात भोंगऱ्या बाजार भरतो.

 होळीसाठी वनवासी, साखरेचे नक्षीदार दागिने घालतात. हे दागिने परस्परांमध्ये भेट म्हणून वाटतात. वनवासींमध्ये लोकसंगीताला खूप जोर चढतो. त्या तालावर नाच-नाचून वनवासी बंधु-भगिनी आसमंत त्या वातावरणाने भारून टाकतात. सगळा संकोच आणि बुजरेपणा सोडून सर्व स्त्री-पुरुष मनसोक्त सहभागी होतात. काही वनवासी मुखवटे लावून विविध सोंगे वठवतात. ती प्रामुख्याने वनातील प्राण्यांची, पशु-पक्ष्यांची, देव-देवतांची सोंगे असतात. त्यावर श्रद्धा ठेवून नवसही बोलले जातात आणि पुन्हा ते फेडण्यासाठी पुढच्या वर्षी होळीच्या सणात सहभागी व्हावेच लागते.

 होळीच्या या आनंदाच्या उधाणात त्यांची खरी जीवन संस्कृती आपल्याला अनुभवता येते.

 या खानदेशी होळीत प्रामुख्याने पावरा, तडवी, गावीत, भिल्ल याबरोबरच कोकणा, महादेव कोळी, कातकरी, ठाकूर, मल्हार कोळी, ढोरकोळी, वसावी, बिलाली असे सगळेच सहभागी होतात.

 असा हा त्यांचा सण विविध पाड्यांवरच्या सगळ्यांना एकत्र आणतो. जणू तो वनवासींचा मेळावा भरतो. वनवासी दाम्पत्य मुलाबाळांसह

वनवासींचा होलिकोत्सव
६७