पान:विश्व वनवासींचे.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "आमच्या ठेकेदार मालकाने आमचा रोजगार/पगार पण दिला नाही; कारण आम्ही होळीची सुटी मागितली."

 “तरी तुम्ही एवढ्या लांब पायी-पायी कसे जाणार?"

 "हो, आम्ही गावी जावू नये म्हणूनच त्याने पगार केला नाही." पगार नाही तर नाही, पण होळी आली ना जवळ, कसेही का होईना, आणि कोठून का होईना पण होळीला आपल्या पाड्यावर गेलेच पाहिजे, असा आमचा रिवाज चालत आला आहे."

 मला आश्चर्य वाटले म्हणून मी विचारले, "मग तुमच्या बंधारा बांधण्याच्या कष्टाच्या पगाराचे काय? तो बुडेल.”

 तेव्हा उत्तर आले, “ पगार कोठे जातो? तो आम्ही परत आल्यावर सगळे मिळून वसूल करू. पण गावचा होळी सण चुकवायचा नाही."

वनवासींच्या उद्गाराने त्यांची गावी जाण्याची तळमळ, तगमग सगळे उमगले.

बोरगावची होळी

 मग मुद्दामच पुढे रामदास कोल्हे या माझ्या विद्यार्थ्याच्या गावी जावून, रात्रभर जागून वनवासी बंधूंची होळी अनुभवली.

 नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळची सापुतारा रस्त्यावरील त्याचे ते छोटेसे बोरगाव होते. तेथे सर्व पाड्यांची मिळून “एक गावएक होळी' अशी चांगली प्रथा होती. एरंडाचे मोठे खोड अथवा बांबूचा दांडा गावाच्या चौकात मध्यभागी रोवून सगळे गावकरी कुटुंबियांसहित सामायिक होळीला पाच-पाच गोवऱ्या मिळेल तेवढा लाकूड-फाटा असे उपलब्ध जळण देतात. मध्यरात्रीला पेटवलेली ती होळी भडकते. अगदी विजेच्या तारांना पोहचेल एवढा जाळाचा भडका उडतो. सगळेच पुरुष-महिला होळीभोवती फेर धरून बसलेले असतात. ढोल-ताशे, वाजंत्री, डाका मध्यरात्री वाजवून बेहोश धुंदीत नाचतात. घरा-घरातून पेटलेल्या होळीला नैवेद्य येतो. नारळ फोडतात, मनोभावे होळीची पूजा करतात. अंगारे धुपारे लावतात, यात खरी-खुरी श्रद्धा

६६
विश्व वनवासींचे