पान:विश्व वनवासींचे.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवासींचा होलिकोत्सव

 प्रत्येक समाजामध्ये विशिष्ठ उत्सवांना, सणांना फार मोठे महत्त्व असते. आपल्या वनवासी बांधवांचा सर्वात आवडता आणि सर्वात महत्त्वाचा सण शिमगा-होळी ! हा रंगोत्सव मानला जातो. यात धुलिवंदनालाही महत्त्व आहे. लोक दसरा-दिवाळीला जेव्हढे महत्त्व देतात त्यापेक्षाही होळी-शिमग्याला जास्त देतात. फाल्गून महिना सुरू होण्याच्या आधीपासूनच म्हणजे माघ महिन्यापासूनच त्यांना होळी साजरी करण्याचे वेध लागतात.

एक स्वानुभव

 वनवासींच्या होळीच्या सणाच्या कमालीच्या ओढीचे प्रत्यक्ष विलक्षण अनुभवाचे उदाहरण प्रारंभी द्यावेसे वाटते. मी सहज प्रवासाच्या निमित्ताने हरिहरेश्वर-श्रीवर्धन गावाकडे गेलो तेव्हा रस्त्याने सहज फिरताना मला वनवासी बंधू-भगिनींचा ताफा भेटला, नव्हे ती झपझप चालणारी वनवासींची टोळी भेटली होती. योगायोगाने त्या वेळी मी जव्हारमध्येच (ठाणे जिल्हा) कार्यरत होतो तेव्हा जव्हार - मोखाडा मला नवखा नव्हता. तेथील वनवासी स्त्री पुरुष जवळून ओळखीचे होते. तेव्हा न राहावून मी परिचय नसतानाही त्यांना थांबवून बोललो. या वनवासींनाही जाता येता कोणी बोलले तर त्यांनाही बरे वाटते; आणि काय आश्चर्य ही सर्व मंडळी जवळच्या मोखाडा तालुक्यातील होती. आमच्यात मी जव्हारचा म्हटल्यावर सुख संवाद सुरू झाला तो असा -

 “एवढ्या घाईने पायी-पायी तुम्ही कुठे निघालात?” मी विचारले.

 "आम्ही आता मोखाड्याला पायी-पायीच जाणार आहोत." त्यांचे उत्तर मिळाले.

 “अरे बाबांनो! कुठे श्रीवर्धन - हरिहरेश्वर आणि कुठे मोखाडा, एवढ्या लांब पायी-पायी असे कसे निघालात?"

६५