पान:विश्व वनवासींचे.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिला शेतीत मग्न राहिलेल्या वनवासींनी सोडविले नाही म्हणून 'जळो तुझी जमीन' हा शाप दिला. मग वनवासींनी प्रार्थना करून हा उ:शाप मिळविला. राब जाळून मग शेतात तो पेरणी करतो.

 'तण खाई धन', 'वावरात पिकू दे, आमचे पोट भरू दे', 'माय माझी तू, घरात सोनं पडू दे', 'फडका घे मडका घे....सूट' एक फडकं आणि एक मडकं जगायला माणसाला पुरे होते. 'होळी जळली, थंडी पळाली' अशा त्यांच्या म्हणी, वाकप्रचार आहेत.

 पूर्व दिशेला 'उगवती' आणि पश्चिम दिशेला 'मावळती' सारखे चपखल शब्द येथे रूढ आहेत. महिने आणि नक्षत्र यांच्याबद्दल ठाणे जिल्ह्यातील वनवासींच्या जाणिवा पर्यावरण तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. उदा. 'जेठ अन् पाण्याची भेट', 'भादवा अन् हंडी मडकी वाजवा', 'पुस करी हुस', 'माही बीजा कोंबडी शिजा' - पोशापोशांनो उगाच निजा', 'चैत म्हणजे दैत', पाणी आबादाणी - शेतकऱ्याला सोन्यावाणी', 'पडल उतरा त हाल खाईना कुतरा', 'पडतील स्वाती त पिकतील मोती', 'पडल्या मघा नाही तर वरती बघा', 'अरदडा त नयी भरती गरदडा' 'हाती करील अन्नाची माती'. असे हे आडाखे निसर्गाशी निर्माण झालेल्या नात्यातून आढळतात. उदा. मुंग्या आपली अंडी घेऊन वर चालल्या, की समजावे यंदा भरपूर पाऊस पडणार, कारण मुंग्या सुरक्षित जागी अंडी हलवतात. कावळ्याने घरटे शेंड्यावर बांधले तर समजावे यंदा पाऊसपाणी कमी आहे. जमिनीत कीडे, कीटक झाले, पिंपळ हिरवा गर्द झाला, पळसाला केसरी रंगाची फुलं आली, की पावसाळा सुरू होणार आहे. वारुळाच्या वरच्या भागातील कंगोऱ्यावरून होकायंत्राप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील वनवासी उत्तर-दक्षिण दिशा ओळखतो. ठाणे जिल्ह्यातील वनवासींचे कौटुंबिक जीवन हालाखीचे असते. हा वनवासी उपाशी राहतो पण भीक मागत नाही. तो मुळात भिकारी नाही. वनवासी प्रमाणिक आहे तो चोरी करीत नाही. या वनवासींमध्ये वेश्या व्यवसाय नाही. सामान्यत: ठाणे जिल्ह्यातील वनवासींचे हे वेगळेपण आहे. पैशाअभावी विवाह न करता तो सर्व संमतीने एकत्र, एकनिष्ठ राहू शकतो. आजच्या नव्या युगात ठाणे जिल्ह्यातील वनवासींचे हे सांस्कृतिक धन आपण जपले पाहिजे.

***
विश्व वनवासींचे
६४