पान:विश्व वनवासींचे.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नारद, सारजा, गावदेव आणि पहाट होते तेव्हा शेवटी जगदंबेचे सोंग नाचते. ही सोंगं रात्रभर क्रमाने नाचतात. प्रेक्षकांची तोबा गर्दी असते. या निमित्ताने जत्रा भरते. त्यात माणुसकीचा पाझर आहे. कौटुंबिक सुखदु:खे वाटून घेऊन तरुण-तरुणींची लग्ने जुळण्यालाही हीच संधी असते.

 ठाणे जिल्ह्यातील ढोल नाचही प्रसिद्ध आहे. त्यात पिरॅमिड सदृश्य कसरती आहेत. नाचणारे काटक असतात. घामाघूम होईपर्यंत ढोलनाचात न उलगडणारे गाणे गात धूम करतात. कोलांट्या उड्याही मारतात. संबळ, डाका, ढोल, झांज वाजवत रात्र-रात्र जागवितात. देवीचा गोंधळ, आखातीजा, नवीन धान्य, कवळी भाजी हे सगळे सणवार साधेपणाने चालूच असतात. सणाच्या दिवशी भाताबरोबरच गूळ-कणिकेची उंडी टाकून ते शिजवतात. गव्हाची पोळी हेच त्यांचे पक्वान्न असते. अत्यंत काटकसरीने माफक खर्चात कला-क्रीडा यात हा वनवासी अमर्याद आनंद उपभोगतो. ठाणे जिल्ह्यातील 'थाळगान' ही कला यादृष्टीने वाखाणण्याजोगी आहे. काशाचा थाळा, मेण, सनकाडी सारोट्याची एवढे पुरे. ती काश्याच्या थाळीतल्या मेणात रोऊन त्यावरून खालपर्यंत कथेकरी बोट फिरवून सुस्वर कंपन निर्माण करतो आणि त्या कंपनांच्या सूरात कथा कथन करतो. जेवढा वेळ ऐकणाऱ्यांना आहे तेवढा वेळ ही कथा चालू राहते. ठाणे जिल्ह्यात वनवासींचे सामुदायिक विवाह स्वयंसेवी संस्था लावतात तसेच एक 'काज' नावाचा सामुदायिक श्राद्धविधीही साजरा होतो. त्यात महत्त्वाचे म्हणजे विधवा स्त्रिया आणि विधुर पुरुष यांचे पुनर्विवाह जुळवून पुनर्वसन केले जाते. त्यातून शेतीसाठी लागणारे संसार पुन्हा उभे राहातात. वेळप्रसंगी गरोदर स्त्रीशीही लग्न करून कमालीचे स्त्री दाक्षिण्य व' मनाचा मोठेपणा दाखविण्याची क्षमता या वनवासींमध्ये आहे. पूर्वीच्या घरोब्यातून झालेल्या मुलाला ते 'ओढ्या' म्हणतात पण स्वीकारतात.

 ठाणे जिल्ह्यातील वनवासींच्या म्हणी, वाक्प्रचार, उखाणे यात साहित्य गुणापेक्षा पर्यावरण शास्त्र भरलेले आहे. हे मोठे आस्वाद्य भांडारच आहे. उदाहरणार्थ पहा 'झाडतठं वारा....पडती पाण्याच्या धारा' हा वनवासी शेत जमिनीला 'काळी आई' म्हणतो. 'जळो पण पिको' ही सीतामाईची उ:शापवाणी आहे. रावणाने पळवून नेताना

ठाणे : वनवासी लोकसंस्कृती

६३