पान:विश्व वनवासींचे.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाला इत्यादी वनस्पतींतून त्यांना असाध्य अशा रोगांवरील उपचार करता येतात. विशिष्ट झाडाची पाने गोड लागली तर सर्पाने दंश केला आहे व कडू लागली तर सर्पाने दंश केला नाही हे ते सांगतात. ठाणे जिल्ह्यातील वनवासी फक्त आजचा विचार करूनच जीवन जगतात उद्याचा विचार करीत नाहीत. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाणही किरकोळ गोष्टीतून वाढते. त्याच पाऊलवाटेने प्रवास होत राहतो.

 ठाणे जिल्ह्यातील वनवासींमध्ये सुगीच्या दिवसात तारपा नृत्य मोठ्या उत्साहात सादर केले जाते. आपली तहान-भूक विसरून, बेभान होऊन धुंद करणारे असे नृत्य ते सादर करतात. आपले अर्धपोटी जगणे, नागडे, उघडे राहणे या साऱ्याचा त्याला विसर पडतो. स्त्री-पुरुष हा भेदही शिल्लक राहात नाही. तारपा गाल फुगवून पुंकणारा, न थांबता वाजविणारा कसदार, बलदंड तरुण असतो. त्याच्या वाजविण्याच्या तालावर वनवासी फिदा असतात. मोठ्या खुषीत तारपाच्या नादात त्या गंगतात. असा हा ठाणे जिल्ह्यातील तारपा नाच वनवासींच्या सभोवताली वर्तुळाकार फड उभवितो, खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तारपा नाचात वनवासी स्त्री-पुरुष आपल्या व्यथा, दुःख, कष्ट विसरून मोठ्या आनंदात गुंग होऊन नाचतात. बट्रांड रसेल हे पाहून उद्गारले होते, 'वनवासींनो, तुम्ही मला तुमची ही बेहोशी द्या. मी माझी सारी ग्रंथ संपदा तुम्हांला समर्पित करायला तयार आहे.' वनवासींची ही हजारो वर्षे चालत आलेली परंपरा मनोज्ञ आहे. या वनवासींच्या सांस्कृतिक परंपरेनेच, नृत्यगान या उत्सवांनीच त्यांचे कष्टमय जीवन सुसह्य आणि रोचक बनविले आहे. त्याचा परामर्श घेणे उद्बोधक आहे. वनवासींच्या ठाणे जिल्ह्यातील अशा या विविध कलांचे मोल फार मोठे आहे. त्यात निसर्गाशी नाते प्रस्थापित झालेले आहे.

 ठाणे जिल्ह्यातील लक्षवेधी उत्सव म्हणजे 'बोहाडा' असतो. जगदंबेचा उत्सव. या उत्सवात विविध देवादिकांची वेषभूषा करून, मुखवटे घालून सोंगे सादर केली जातात. कोणते सोंग कोणाकडे याचीही परंपरा रूढ आहे. प्रत्येक सोंग आपापल्या वेगळ्या चालीने/ पद्धतीने नाचते. त्याच्या वाद्यांचीही एक वेगळी ढब असते. गणपती, बहिरोबा, हिरवादेव, अहिरावा, वेताळ, नृसिंह, दुंदुभी, म्हसोबा,

विश्व वनवासींचे
६२