पान:विश्व वनवासींचे.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दाखवल्यावर ते म्हणतात, 'खरं म्हणजे पोट दुखतं यातलं खरं काही कळतच नसतं म्हणून ही मुलं शिक्षण टाळण्यासाठी असे बहाणे करतात.' घरी बसतात आणि मग मोकळ्या रानात नदीकाठी उनाडक्या करीत बसतात. शिक्षणापेक्षा निसर्ग सान्निध्यातच वनवासींना खरा रस आहे. रानचा वारा पीत हुंदडायची त्यांची मुळात संस्कृती आहे.

 ठाणे जिल्ह्यात एक प्रश्न लक्षवेधी आहे. शेतातील नवीन धान्य निघाले, की ते देवाला/देवीला वाहायचे. त्यासाठी वाजतगाजत मिरवणूक निघते, मग मात्र दरीतील वनवासी सुगीच्या सगळ्या सणवारात मोठ्या उत्साहात आपले दारिद्र्य बाजूला ठेवून सहभागी होतो. याच शेती पायी वनवासी आपल्या विखुरलेल्या पाड्यालावाडीला चिकटून आहे. रस्त्याच्या कडेला जवळ येऊन एकत्र वस्ती करायलाही तो तयार नाही. जर शेतीवर आपण राहिलो नाही तर शेती आपली राहाणार नाही असा या वनवासींचा समज आहे. म्हणून तो पाडा सोडायला तयार नाही. शहरात तर तो रमतच नाही. ठाणे जिल्ह्यातील प्रदूषित पाण्यामुळे जणु काही अनारोग्याचे वरदानच मिळाले आहे. खरुज, हगवण, त्वचारोग, गॅस्ट्रो, नारू व कुपोषण सगळंच ठाणे जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नावालाच आहे. त्यांची रुग्णवाहिनी सहसा नादुरुस्तच असते. स्वयंसेवी सेवाभावी संस्था आणि त्यांचे काही उमेदीचे डॉक्टर्स मात्र कार्यरत आहेत. सराव म्हणूनही काही भागातील दवाखाने तेवढ्यापुरतेच चालतात. औषधांचा तुटवडा नेहमी जाणवतो आणि सर्पदंशाच्या केसेस अधिक आढळतात. त्यांच्या पायी गमबुट नाही, मग हे होणारच. सोयीनुसार गाजावाजा करणारी आरोग्य शिबिरं होतात पण शेवटी वनवासींना 'भगत' हाच जवळचा वाटतो. हा भगतच मग त्यांचा डॉक्टर बनतो.

 वनवासींची मानसिकता विचित्र आहे. अजुनही ठाणे जिल्ह्यातील वनवासींमध्ये विपुल अंधश्रद्धा आहेत. भगत, गंडेदोरे, कोंबडे, बकरे इ. सगळं झाल्यावर शेवटच्या अवस्थेत दवाखान्यात नेतात. भगताला त्याचे पैसे मिळतात. काही अपवादात्मक ठिकाणी डोळ्यातील मोतीबिंदू बाभळीच्या काट्यानेही काढतात असे ऐकायला मिळते. वस्तुत: ठाणे जिल्ह्यातील वनवासींजवळ, जुन्या जाणत्या वनवासींकडे वनौषधींची भरपूर माहिती आहे. ते चांगले वैद्य आहेत. गुळवेल, गोखुर, टणटणीचा

ठाणे : वनवासी लोकसंस्कृती

६१