पान:विश्व वनवासींचे.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भांडे भरले, की २-४ मैलावरून चढ-उतार पार करीत पाणी आणायचं अशा या अडचणी आहेत. पाड्यावर अद्यापही वनवासींची फसवणूक बोहरी आणि कच्छींच्या दुकानातून होत आहे. अगदी साधा साबणही सुगंधी स्नानाच्या साबणाच्या भावात विकला जातो. पिळवणूक आणि शोषण चालूच आहे. अजूनही मोठ्या साहसाने, मधमाशा डसत असूनही मधाचं पोळं होरपळून काढलेला मध बाटलीभर असूनही अवघ्या ५ रुपयात त्यांच्याकडून विकत घेतला जातो. गावठी बाभळीचा अस्सल डिंक भारंभार देऊन मीठ, कांदे बटाटे विकत घेणारे वनवासी बांधव आहेत. पाच रुपयात घेतलेल्या मधाचे दुकानदार १०० रुपये करतो.

 वन संपत्ती आणि वनौषधी हिरडा, बेहडा, डिंक, जांभूळ, करवंद, बोर, भोपळा, काकड्या, कैऱ्या मिळेल त्या भावात विकतात. त्या पैशातूनच मग जीवनावश्यक पदार्थ तेल, मीठ, गूळ, कांदे विकत घेतात. शिवाय वनवासींना मिळणाऱ्या नोटाही धड मोजता येत नाहीत. एक हिरवी म्हणजे पाचाची, एक लाल म्हणजे दोनची नोट मिळून ७ रुपये होतात. असा या वनवासींचा एखाद्या ओट्यावर बसून हिशोब चालू राहतो. शिवाय पाड्या-पाड्यात खाजगी, हात उसना, वनवासींना कर्जबाजारी करणारा व्यवहार चालतोच. गाय-म्हैस घ्यायला पैसे देऊनही स्वत: कमी भावाने दूधाचा रतीब या वनवासींना घालावा लागतो. त्यामुळे पाड्यावर सावकाराच्या दावणीला हा वनवासी सहज बांधला जातो. रेशनकार्डावरची साखर घ्यायला त्याच्याकडे पैसे नाहीत. म्हणून ती साखर बोहरी घेऊन ज्यादा भावाने विकतात.

 वनवासी पालकांचे आपल्या पाल्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. दरीतून ते वर यायलाही उत्सुक नाहीत. ठाणे जिल्ह्यातील पालकांचा मुलामुलींच्या शिक्षणातील सहभाग अपवादात्मकच आहे. एखाद्या बेरिस्ते वा मेढे या सारख्या अती दुर्लक्षित पाड्यावरील मुलांना शेती कामामुळे शाळा सोडून गुरे वळावी लागतात. आपल्या धाकट्या भावंडांना सांभाळण्यासाठी शाळा सोडावी लागते. शिक्षणाने मुलांना नजर लागते, करणी केली जाते, तो मुलगा जगत नाही, आजारी पडतो, अशा समजुती आहेत. एक किस्सा असा आहे. पालकाने मुलाला शाळेत आणून घातले, की तो मुलगा पोट दुखतं म्हणायचा. पालकांना काही कळायचे नाही म्हणून कॉटेज हॉस्पिटलच्या डॉक्टरांना

विश्व वनवासींचे
६०