पान:विश्व वनवासींचे.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकासाला हातभार लागेल. जव्हार, मोखाडा, सूर्यमाळ, देवबांध, विक्रमगड, वाडा, तलासरी, शहापूर, डहाणू, सूर्यानगर, कासा, मनोर या वनवासी भागांना एकत्र गुंफणारे स्वतंत्र वनवासी विद्यापीठ शिक्षण विकासासाठी असावे अशीही एक विचार धारा ठाण्यात रूढ आहे. याच कारणाने वनवासी संस्कृती, लोकजीवन, शिक्षण, ललितकला यांच्या संशोधन-अभ्यासाचे स्वतंत्र दालन त्यामुळे खुले होईल.

 ठाणे जिल्ह्यातील वनवासींचं जीवन, त्यांची संस्कृती विशेष लक्षणीय म्हणून अभ्यासनीय आहे. ठाणे जिल्ह्यात वनवासींच्या एकूण आठ जाती आहेत. महादेव कोळी, कोकणा, वारली, ढोर कोळी, मल्हारकोळी, क ठाकूर, म ठाकूर आणि काथोडी किंवा कातकरी. त्यांची संख्या कमी-अधिक आहे. या अनुसूचित जमातीमध्ये शिकलेले आणि नोकरीमध्ये वर्ग १,२,३ मधील जागा पटकावणारे पदवीधर आढळतात. पण हे आहेत मोजकेच. बहुतांश लोक याच जातीतील कमालीचे मागासलेले आहेत. विशेषत: कातकरी-काथोडी ही जमात शिक्षणापासून वंचित आहे. अजूनही मृत जनावरांचे मांस खाण्याची प्रथा चालूच आहे. एकदा मागास वर्गीय जात म्हटली, की निदान या जातीत तरी एकोपा आपल्याला अपेक्षित असतो पण तशी मात्र वस्तुस्थिती नाही. वनवासी जातींमध्येही उपजाती आणि पोटभेद आजही अस्तित्वात आहेत. त्यात आपण मिसळलो तरच ते लक्षात येते अन्यथा नाही. पण या अनावश्यक जातभेदाची पाळंमुळं खोलवर रुजलेली दिसतात.

 आजही ठाणे जिल्ह्यातील एखाद्या अति ग्रामीण आणि दुर्गम पाड्यावर, जिथे एकही एस्.टी. बस दिवसभरात एकही फेरी करीत नाही तिथं अठरा विश्व दारिद्र्य कशाला म्हणतात ते पाहायला मिळाले. केवळ एक लंगोटी लावून उघडेबंब लोक झाडावर चढून विळ्याने सरपण काढताना दिसतील. जाळण्यासाठी 'राब' काढतील. नदीवर बाया-बापड्या उघड्यानं आपले एकुलते एक वस्त्र वाळत घालून आंघोळ करताना दिसतील. पुन्हा ही आंघोळही सवड जेव्हा मिळेल तेव्हाचीच. प्यायला पाणी नसते म्हणून मग आंघोळी नदी, विहिरीवरच होतात. एखाद्या झऱ्यातील आटत चाललेल्या पाण्यात आणखी खोल खड्डा करून तिथे गाडग्या-मडक्यात थोडे थोडे पाणी भरायचे. गाडगं-

ठाणे : वनवासी लोकसंस्कृती

५९